महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना 'युनेस्को'चे मानांकन मिळाल्याने जागतिक स्तरावर राज्याचा गौरव
शिवशाही वृत्तसेवा,वाई प्रतिनिधी शुभम कोदे
"छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या महाराष्ट्रातील १२ गड-किल्ल्यांना 'युनेस्को'चे (UNESCO) जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळाले आहे. यामुळे निश्चितच पर्यटन वाढून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. मात्र, या गड-किल्ल्यांच्या केवळ भौतिक संरक्षणापुरते मर्यादित न राहता, महाराजांच्या नीतिमूल्यांची जपवणूक करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे," असे प्रतिपादन महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव **विकास खारगे** यांनी येथे केले.
वाई येथील लो. टिळक स्मारक संस्था संचलित वसंत व्याख्यानमालेत 'युनेस्कोचा गड सर करताना' या विषयावर आयोजित मुलाखतीत ते बोलत होते. डॉ. रुपाली अभ्यंकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.
प्रशासकीय प्रवास आणि जिद्द
यावेळी श्री. खारगे यांनी आपला जीवनप्रवास उलगडताना सांगितले की, इचलकरंजी येथील एका सामान्य कुटुंबात जन्म होऊन, पालिका शाळेत प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या मुलाचा आय.ए.एस. (IAS) होण्यापर्यंतचा प्रवास कष्टसाध्य होता. १९९४ च्या बॅचचे अधिकारी असलेल्या खारगे यांनी चार मुख्यमंत्र्यांच्या काळात अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहिले आहे. लंडनमधून छत्रपतींची 'वाघ नखे' परत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.
युनेस्कोचे मानांकन आणि पुढील आव्हाने
गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवून देण्यासाठी केलेल्या संघर्षाबद्दल बोलताना ते म्हणाले की, "किल्ल्यांची स्थापत्यशैली, महाराजांची युद्धनीती आणि इंटेलिजन्स कलेक्शन याचे पुरावे पुरातत्व तज्ञांच्या मदतीने युनेस्कोसमोर मांडले. आता हे किल्ले जागतिक स्तरावर पोहोचले आहेत, पण खरी जबाबदारी आता सुरू झाली आहे."
पुढील १० वर्षांचा आराखडा
दुरुस्ती व स्वच्छता
किल्ल्यांचे पावित्र्य राखून त्यांची दुरुस्ती करणे.
पर्यटक सुविधा - पुढील तीन वर्षांत पर्यटकांसाठी जागतिक दर्जाच्या सोयी निर्माण करणे.
रोजगार- स्पेशल ट्रेन आणि परदेशी पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक गाईड व बचत गटांना रोजगार मिळेल.
शासकीय निधी - या सर्व कामांसाठी शासन निधी उपलब्ध करून देणार असून त्याचा १० वर्षांचा अहवाल सादर करावा लागणार आहे.
शिवरायांच्या मूल्यांची व्याप्ती
"छत्रपतींचे कार्य केवळ युद्ध आणि किल्ल्यांपुरते मर्यादित नव्हते. त्यांचे प्रशासन, मराठी भाषेचे संवर्धन, शेतीविषयक धोरण आणि सामाजिक मूल्ये आजही तितकीच प्रेरणादायी आहेत. विकसित भारतासाठी तरुणांनी या मूल्यांचा अंगीकार करून 'स्कील इंडिया'मध्ये योगदान द्यावे," असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभिजित क्षीरसागर यांनी केले, तर आभार प्रसाद कुलकर्णी यांनी मानले. या प्रसंगी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्यासह महसूल विभागाचे अधिकारी आणि वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक वारसा ठरलेले १२ गड-किल्ले
महाराष्ट्रातील ऐतिहासिक वैभवाचा डंका आता जगभरात वाजणार आहे. युनेस्कोने खालील १२ किल्ल्यांची 'जागतिक वारसा स्थळ' म्हणून नोंद केली आहे.
१. लोहगड २. रायगड ३. साल्हेर ४. शिवनेरी ५. राजगड ६. प्रतापगड ७. पन्हाळा ८. सुवर्णदुर्ग ९. विजयदुर्ग १०. सिंधुदुर्ग ११. खांदेरी आणि १२. जिंजी (तामिळनाडू).
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




