वाई वसंत व्याख्यानमालेत ‘मागोवा संगीत नाटकांचा’ विषयावर प्रकट मुलाखत; रसिक मंत्रमुग्ध
मराठी संगीत नाटकांनी केवळ मनोरंजन केले नाही, तर शास्त्रीय संगीत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध केले आहे. ही परंपरा म्हणजे आपल्या वैभवाची खऱ्या अर्थाने सुवर्णगाथा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ संगीत अभ्यासक पंडित जयराम पोतदार यांनी केले.
वाई येथील प्रतिष्ठित 'वसंत व्याख्यानमालेच्या' सातव्या पुष्पाप्रसंगी “मागोवा संगीत नाटकांचा” या विषयावर त्यांची सुरेश कृष्णाजी साखवळकर यांनी प्रकट मुलाखत घेतली. या कार्यक्रमातून मराठी संगीत नाटकांचा १८४३ पासूनचा ऐतिहासिक आणि सांगीतिक प्रवास उलगडण्यात आला. यावेळी तबल्याला ओमकार देगलूरकर तर हार्मोनियमला संगीत महामहोपाध्याय श्री. शिवदास देगलूरकर यांनी साथसंगत केली.
तंजावर ते किर्लोस्कर- ऐतिहासिक प्रवास
मुलाखतीदरम्यान पोतदार यांनी संगीत नाटकांच्या मुळावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, विष्णूदास भावे यांचे ‘सीता स्वयंवर’ (१८४३) हे पहिले नाटक मानले जात असले, तरी त्यापूर्वी २०० वर्षांआधी तंजावरच्या व्यंकोजी राजांनी संगीत नाटके लिहिली होती. शहाजी राजांनी १६९० मध्ये लिहिलेले ‘सीता कल्याण’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र, ३१ ऑक्टोबर १८८० रोजी अण्णासाहेब किर्लोस्करांच्या ‘संगीत शाकुंतल’ने मराठी रंगभूमीचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला.
बालगंधर्वांच्या त्यागाचा आणि कलेचा महिमा
कार्यक्रमात बालगंधर्वांच्या आयुष्यातील हृदयद्रावक प्रसंगाचा उल्लेख करण्यात आला. ‘मानापमान’ नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या दिवशीच बालगंधर्वांच्या मुलीचे निधन झाले होते. मात्र, प्रेक्षकांचा आनंद हिरावला जाऊ नये म्हणून त्यांनी वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून प्रयोग केला आणि ‘नाथ हा माझा’ या पदाला सहा वेळा ‘वन्स मोअर’ घेतला. असा विलक्षण कलावंत होणे नाही, अशा शब्दांत पोतदार यांनी त्यांना आदरांजली वाहिली.
नाटकातील वैभव आणि चालींचा उगम
संगीत नाटकांच्या वैभवाबद्दल सांगताना त्यांनी ‘स्वयंवर’ नाटकाचा दाखला दिला. या नाटकासाठी थेट राजवाड्यांतून खरे दागिने, शालू मागवले जात आणि पॅरिसहून अत्तर आणले जाई. तसेच, अनेक प्रसिद्ध पदांच्या चाली लावण्यांवरून कशा घेतल्या गेल्या, हेही त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. उदा. ‘सौभद्र’ मधील ‘वद जाऊ कुणाला शरण’ ही चाल यमुनाबाई वाईकर यांच्या लावणीवर आधारित होती.
अजरामर पदांचे सादरीकरण
मुलाखती दरम्यान पंडित पोतदार यांनी विविध अजरामर पदे गायली, ज्यात:
‘नेसली पितांबरी जरी ग’
‘सत्य वदे वचनाला नाथा’
‘चंद्रिका ही जणू’
‘नाही मी बोलत नाथा’
यांसारख्या पदांनी वाईकर रसिकांना जुन्या सुवर्णकाळाची प्रचिती दिली.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या प्रारंभी सौ. माया अभ्यंकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. पंडित जयराम पोतदार यांचा सत्कार डॉ. रूपाली अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रायोजक डॉ. शरद अभ्यंकर, वर्षा बेडेकर आणि विनीत पोफळे यांचाही सत्कार करण्यात आला. या सांस्कृतिक सोहळ्याला वाईतील रसिक प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




