रामायण-महाभारताचा कालखंड हजारो वर्षांपूर्वीचा - खगोलशास्त्रीय पुराव्यांतून वैज्ञानिक कालगणना शक्य

वाई वसंत व्याख्यानमालेत निलेश ओक यांचे व्याख्यान

Spring Lecture Series, Satara, wai, shivshahi news.

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे) 

वाई वसंत व्याख्यानमालेच्या सहाव्या पुष्पात “रामायण महाभारत : वैज्ञानिक काल निर्णय” या विषयावर निलेश ओक यांचे अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंद शेलार होते.  

निलेश ओक यांनी आपल्या व्याख्यानात भारतीय इतिहास, खगोलशास्त्र, संस्कृत भाषा आणि वैज्ञानिक पद्धती यांच्या आधारे रामायण व महाभारताच्या कालखंडाचा शोध कसा घेता येतो याचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी सांगितले, “आज शिक्षण व्यवस्थेमध्ये इंडियन नॉलेज सिस्टीम अर्थात IKS हा विषय समाविष्ट केला जात आहे. मात्र भारतीय संस्कृती, वेद, रामायण व महाभारत यांच्या कालखंडाबाबत अनेक ठिकाणी चुकीची माहिती शिकवली जाते. काही जण वेद इसवीसनपूर्व १७०० च्या आसपासचे असल्याचे सांगतात, तर काही जण रामायण-महाभारत इसवीसनपूर्व ४०० च्या आसपास लिहिले गेले असे मांडतात. अनेकदा शिक्षकांना स्वतःचे मत वेगळे असूनही अभ्यासक्रमानुसार शिकवावे लागते. मात्र मला जे वैयक्तिकरित्या पटते तेच मी जगासमोर मांडतो.  

१९९४ मध्ये पीएचडीच्या अभ्यासादरम्यान मला महाभारताच्या कालगणनेविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि जवळपास चौदा वर्षांच्या संशोधनानंतर २००९ मध्ये त्यावरील निष्कर्ष मांडता आले. एका आंतरराष्ट्रीय परिषदेत शिकागोच्या एका प्राध्यापकाने भारतीयांना उद्देशून ‘यू डोन्ट हॅव हिस्टरी’ असे म्हटले होते. त्यावर मी ‘वी डोन्ट हॅव हिस्टरी, वी हॅव इतिहास’ असे उत्तर दिले. कारण ‘हिस्टरी’ म्हणजे केवळ घटनांची नोंद, तर ‘इतिहास’ म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या पुरुषार्थांना मार्गदर्शन करणारा पूर्ववृत्तांत. ‘धर्मार्थकाममोक्षाणाम् उपदेशसमन्वितम् । पूर्ववृत्तकथायुक्तम् इतिहासं प्रचक्षते ॥’ या व्याख्येनुसार भारताकडे इतिहास आहे; इतरांकडे फक्त हिस्टरी आहे.  

पुढील पिढ्यांपर्यंत इतिहास पोहोचवण्यासाठी स्थिर भाषा आवश्यक असते. ज्ञानेश्वरीची आठशे वर्षांपूर्वीची मराठी आज समजण्यासाठी भाषांतर लागते, कारण भाषेमध्ये बदल झाले. मात्र संस्कृत भाषेमध्ये अत्यल्प बदल झाल्यामुळे हजारो वर्षांपूर्वीचे साहित्य आजही समजू शकते. इतिहास समजण्यासाठी काळ समजणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भारतीय ऋषींनी खगोलशास्त्राच्या माध्यमातून कालगणना विकसित केली. आजच्या घड्याळातील बारा आकड्यांची संकल्पनाही भारतातून आली. ग्रीनिचचे शून्य अंश रेखावृत्त इंग्रजांनी १८६० मध्ये निश्चित केले; त्याआधी उज्जैन हेच कालगणनेचे केंद्र होते. भारतात दिवसाची सुरुवात सकाळी सहा वाजता होत असे, तर इंग्रजांनी ती मध्यरात्री केली.  

गुरु-शिष्य परंपरेमुळे भारतीय ज्ञानपरंपरा टिकून राहिली. पूर्वी झाडांच्या सालींवर लिहिलेले ग्रंथ नष्ट झाले तरी पाठांतरामुळे त्यांची पुनर्लेखनं झाली. महाभारतात सुमारे ३०० खगोलशास्त्रीय संदर्भ आहेत. व्यासांनी धृतराष्ट्राला ‘मी कुरुकुलाचा इतिहास अमर करून ठेवेन’ असे सांगितले होते. या संदर्भांच्या आधारे महाभारत साधारण साडेसात हजार वर्षांपूर्वी घडले, तर रामायणातील सुमारे ६०० खगोलशास्त्रीपुराव्यांवरून राम-रावण युद्ध बारा हजार दोनशे वर्षांपूर्वी घडल्याचा दावा करता येतो. या दोन्ही महाकाव्यांमध्ये वेदांचे उल्लेख असल्याने वेद त्याही आधीचे असल्याचे स्पष्ट होते. ऋग्वेदातील सरस्वतीच्या वर्णनावरून वेदांची निर्मिती किमान २१ हजार वर्षांपूर्वीची असावी असे सूचित होते.  

महाभारत युद्धासाठी भारतासह पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, टर्की, जॉर्डन आणि इंडोनेशियापर्यंतचे राजे आले होते. साधारण १८ अक्षौहिणी म्हणजेच चाळीस लाख योद्धे या युद्धात सहभागी झाले. गेल्या चारशे वर्षांत १४० पेक्षा अधिक संशोधकांनी महाभारताचा कालखंड शोधण्याचा प्रयत्न केला आहे. विज्ञानामध्ये ‘हायपोथेसिस’ मांडून पुराव्यांच्या आधारे निष्कर्ष काढले जातात. भारतीय न्यायदर्शनात महर्षी गौतमांनी प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, उपनय आणि निगमन हे तत्त्व आधीच सांगितले होते.  

महाभारतातील ‘अरुंधती-वसिष्ठ’ संदर्भ माझ्या संशोधनाचा महत्त्वाचा आधार ठरला. सामान्यतः वसिष्ठ तारा अरुंधतीच्या पुढे असतो, मात्र महाभारतात अरुंधती पुढे गेल्याचा उल्लेख आहे. खगोलशास्त्रीय अभ्यासातून भूतकाळात असा कालखंड खरोखर अस्तित्वात होता हे स्पष्ट झाले. त्या आधारे महाभारताचा कालखंड दीड हजार वर्षांच्या विशिष्ट पट्ट्यामध्ये निश्चित करता आला. पुढे संशोधक सिद्धार्थ चाब्रा यांनी या कालखंडाचे आणखी संकुचन केले.  

भीष्म पितामह युद्धाच्या दहाव्या दिवशी शरशय्येवर पडले आणि उत्तरायण येईपर्यंत ९५ दिवस तिथेच होते. यावरून युद्ध उत्तरायणाच्या सुमारे १०५ दिवस आधी सुरू झाले असावे. सध्याच्या कालगणनेनुसार उत्तरायण २१ डिसेंबरला येते. मार्गशीर्ष महिना आज डिसेंबरमध्ये येतो, मात्र तो त्यावेळी सप्टेंबरच्या आसपास येत होता. एका भारतीय महिन्याला इंग्रजी कालगणनेत एक महिना पुढे जाण्यास साधारण दोन हजार वर्षे लागतात. यावरून पुन्हा एकदा महाभारताचा कालखंड साधारण सात हजार वर्षांपूर्वीचा ठरतो.  

महाभारतातील शनी, गुरु, मंगळ आणि बुध यांच्या स्थितीचे पुरावेही याच कालखंडाला पुष्टी देतात. विशेष म्हणजे महाभारतात ध्रुवताऱ्याचा उल्लेख नाही. संशोधनातून सात हजार वर्षांपूर्वी ध्रुवतारा पृथ्वीवरून दिसत नव्हता हे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याचा उल्लेख नसणेही महाभारताच्या कालखंडाला आधार देते. रामायणात मात्र युद्धकांडात ध्रुवताऱ्याचा उल्लेख आढळतो. लक्ष्मणाने महेंद्र पर्वतावरून अगस्त ताऱ्याचा उल्लेख केला आहे. नाशिक परिसरातून दिसणाऱ्या पुष्य नक्षत्राच्या स्थानाचे वर्णनही रामायणात आहे. या सर्व खगोलस्थिती साधारण अकरा ते बारा हजार वर्षांपूर्वीच जुळून येतात.  

लंकेच्या संदर्भात हंपीहून नैऋत्य दिशेला असलेल्या प्रदेशाचा उल्लेख रामायणात येतो. द्वारका महाभारतानंतर ३६ वर्षांनी समुद्रात बुडाली असा उल्लेख आहे. संशोधनातून इसवीसनपूर्व ५५२५ च्या आसपास समुद्रपातळीत अचानक वाढ झाल्याचे दिसते. जगभरातील तीस ठिकाणी समुद्रपातळी १५ ते २३ मीटरपर्यंत वाढल्याचे पुरावे आहेत. धोलावीरा आणि लोथल येथे बंदरे का होती याचे स्पष्टीकरणही त्यामुळे मिळते.  

महाभारत हे एक प्रकारचे ‘अनुवंशिक भूकंप’ होते. ९२ शास्त्रज्ञांच्या संशोधनातून साडेसात हजार वर्षांपूर्वी भारत आणि आसपासच्या प्रदेशांत पुरुषांच्या जनुकीय प्रमाणामध्ये अचानक मोठी घट झाल्याचे दिसून आले. एवढा बदल प्रचंड प्रमाणावर पुरुष मृत्यू झाल्याशिवाय शक्य नाही. यावरून महाभारत युद्धाच्या व्यापकतेला वैज्ञानिक आधार मिळतो.  

रामायणातील आणखी एक महत्त्वाचा संदर्भ म्हणजे लंकेच्या प्रवेशद्वारावर दोन, तीन आणि चार सुळे असलेल्या हत्तींचा उल्लेख. सुरुवातीला हा काल्पनिक भाग वाटतो; मात्र डार्विनच्या सिद्धांतानुसार ‘मॅमथ’ नावाचे बहुसुळे असलेले हत्ती सुमारे अकरा हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. त्यामुळे रामायणातील वर्णन त्या काळाशी सुसंगत ठरते.  सुग्रीवाने सीतेच्या शोधासाठी वानरांना चार दिशांना पाठवताना दक्षिण अमेरिका, अँडीज पर्वतरांग आणि अंटार्क्टिकापर्यंतच्या प्रदेशांचे वर्णन केल्याचे दिसते. अंटार्क्टिकाला ‘यमाची राजधानी’ आणि अँडीज पर्वतरांगांना ‘उदय पर्वत’ असे संबोधले आहे. यावरून रामायण आणि महाभारतामध्ये खगोलशास्त्र, भूगोलशास्त्र आणि जीवशास्त्र यांचे विलक्षण ज्ञान अंतर्भूत असल्याचे स्पष्ट होते. या सर्व आकलनासाठी मूळ रामायण व महाभारत वाचणे गरजेचे ठरते व त्याचबरोबर खगोलशास्त्राचा अभ्यासही अवश्य करावा.”  

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनीत पोफळे यांनी केले. प्रमुख वक्ते निलेश ओक यांचा परिचय सौ. पूजा चौंडे यांनी केला .त्यांचा सत्कार गिरीश जाधव यांनी केला.आभार रामप्रसाद घाटगे यांनी मानले.  विलास साळुंखे,  गोविंद कुलकर्णी, डॉ. सौ.गांधारी व डॉ. केदार वनारसे हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते.त्यांचा सत्कार निलेश ओक यांचे हस्ते करण्यात आला.व्याख्यानास वाईकरांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !