समाजात अपप्रवृत्तींचा उदय झाल्याने निरपराधांचे शोषण
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
अल्पवयीन मुलींवर राजरोसपणे होणारे बलात्कार, कर्जाच्या खाईत लोटून आत्महत्या करणारा शेतकरी तर सत्ता व लोभा पायी दिवसा ढवळ्या पडणारे खून,दरोडे आणि सामाजिक प्रतिष्ठे पायी वाटेल त्या थराला जाण्याची मनोवृत्ती समाजात दिवसेंदिवस वाढू लागल्याने मानवी जीवनाचे सारे समीकरणच बदलून गेले आहे. त्याग, निष्ठा, नैतिकता व प्रामाणिकपणा या साऱ्या गोष्टी आता गुळगुळीत झाल्या आहेत. त्यामुळे नैतिक मूल्यांचे आता पूर्णपणे अधिपतन झाले आहे.
समाजात अपप्रवृत्तींचा उदय झाल्याने निरपराधांचे शोषण ही एक नवी संस्कृती समाजात उदयाला येत आहे. विकृत प्रवृत्तीतून निर्माण होणारी ही संस्कृती समाजात मोठ्या प्रमाणात बोकाळत चालली असून सर्वच क्षेत्राला याची लागण झाली आहे.असत्यावर सत्याचा विजय हे आता कालबाह्य वाटू लागले आहे.अहंकार व मोहापायी वाटेल त्या थराला जाण्याची मानसिकता सध्या समाजात रूढ होऊ लागली आहे. विकृत प्रवृत्तीने समाज वाळवी प्रमाणे पोखरत चालला असून त्यामुळे समाजाचे सामाजिक संतुलन आता धोक्यात आले आहे.काळाच्या ओघात मानवी जीवन चक्रातील झालेल्या बदलामुळे समाजाला संवेदनशीलतेचा आता विसर पडू लागला आहे.ती जागा आता विकृत मनोवृत्तीने घेतली आहे.त्यामुळे समाजात अनिष्ट व दुर्दैवी घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. अर्थात प्रत्येक वेळी घडणाऱ्या दुर्दैवी घटनांच्या वेळी राजकारणी मंडळी मात्र सर्वात पुढे ही भूमिका घेत असतात.स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे राजकारणी मंडळी पुढारपण करीत असतात. समाज ही तेवढ्यापुरता जागा होतो. निषेध,आंदोलने, धरणे बरोबरच कॅन्डल मोर्चा काढून गप्प बसतो.
खरे तर अपप्रवृत्ती व विकृती वृत्ती विरोधात ठोस धोरण असायला हवे.तरच भविष्यात अशा प्रवृत्तींना चाप बसेल.नुकतेच पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे चार वर्षाच्या निष्पाप चिमुरडीवर 65 वर्षाच्या नर-धामाने अत्याचार करून तिचा हत्या केली. या घटनेने पुन्हा निष्पाप बालके व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. समाजातील विकृत प्रवृत्ती ही दिवसेंदिवस वाढत असून ही चिंतेची बाब बनलेली आहे. अर्थात भारतीय कायदे व्यवस्थेमध्ये त्रुटीचा फायदा घेत विकृत प्रवृत्तींना आधार मिळत आहे. परिणामी अशा व्यक्तींना बळ मिळत आहे येचेच दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. अर्थात अशा प्रवृत्तींना जरब बसवण्यासाठी भारतीय कायदे व्यवस्थेमध्ये आता बदल करणे गरजेचे आहे. यापूर्वी ही अशीच घटना सातारा जिल्ह्यातील फलटण येथील घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.
फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे ही अशीच एक विकृत व अपप्रवृत्ती व्यक्तींची शिकार झाली आहे.ऐन उमेदीच्या काळात तिने आपले आयुष्य संपविले अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील सासपडे या छोट्या गावात एका शाळकरी मुलीची विकृत व्यक्तीकडून हत्या करण्यात आली. समाजातील हे विदारक स्थिती पाहता समाजाच्या संवेदनाच आता लुप्त झाल्या तर नाहीत ना असे वाटू लागले आहे. जाती जातीत विभागला जात असलेला समाज साधुसंतांची शिकवण विसरत चालला असून जातीय रंगा पुढे माणुसकी व मानवता आता हरपून जाऊ लागले आहे.प्रत्येक घडामोडी व घटनेकडे जात धर्म पंथ पाहूनच बघण्याची वृत्ती समाजात वाढू लागली आहे. समाजा समाजात तेढ निर्माण होणाऱ्या या जाती व्यवस्थेमुळे आज माणूस माणसात राहिला नाही. अन्याय, अत्याचार, शोषण या दररोजच्या घटना पाहता सहनशीलता व संयम ही वृत्ती लोप पावत चालली आहे. जाती-जातीतील उभा संघर्ष हा मानवतेला काळीमा फासणारा आहे. निरपराध व्यक्तींचे शोषण व गुन्हेगारांचे होत असलेले उदात्तीकरण ही आजची संस्कृती निर्माण होऊ लागली आहे. भय आता कोणाचे उरले नसल्याने समाजात गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. यंत्रणेला हाताशी धरून हेतू साध्य करणाऱ्यांचा सध्या फैलाव झाल्याने समाजाचे संपूर्ण सामाजिक समीकरणच आता बदलून गेले आहे.
न्यायाच्या प्रतिक्षेसाठी झटणाऱ्यांना न्याय वेळेत भेटत नसल्याने न्याय देवते बद्दलही आता सर्वसामान्य नागरिक ही शंका व्यक्त करू लागले आहेत समाजात घडणाऱ्या अशा विविध घटनांनी पुन्हा एकदा मानवी मनाच्या संवेदना बोथट तर झाल्या नाहीत ना? असा प्रश्न आता मनाला पडतो.दररोज घडणाऱ्या खून, दरोडा, बलात्कार, आत्महत्या, अत्याचाराच्या घटना मनाला खूप वेदनादायी वाटत असल्या तरी समाजाचा आता याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलत चालला आहे असे दिसून येते. मला काय करायचे ही मनोवृत्ती दिवसेंदिवस समाजात वाढू लागल्याने समाजाच्या आता भावना, संवेदनाच लुप्त होऊ लागल्या आहेत.अन्याय,अत्याचार ही आता नित्याचीच बाब झाली आहे.मनातील विकृतीचे अनोखे दर्शन आता जागोजागी विविध घडणाऱ्या घटनेवरून अनुभवाला मिळते. सत्ता, पैसा या लोभापायी माणसातील माणुसकीच आता हरपली आहे. वेदना आणि व्यथा हेही आता बोथट झाले आहेत. जो तो स्वतःच्या स्वार्थासाठी धावत सुटला आहे. समाजाची सारी घडीच आता आधुनिक काळात विस्कटलेली आहे.
समाजात घडणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या घटना मानवी मनात इतक्या खालच्या थराला का गेली याचेही चिंतन आणी मंथन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे.विज्ञान, तंत्रज्ञानाने समाजाला विकास व प्रगतीचे नवी दालने खुली केली आहेत. परंतु या विज्ञान तंत्रज्ञानाचा गैरवापर करून स्वतःच्या स्वार्थासाठी वाटेल ते करणारी विकृती निर्माण झाली आहे. सध्याच्या युगात राजकारणी तसेच गुंड व प्रशासन यंत्रणा यांची झालेली अभद्र युती मुळे तर विकृत वृत्तीचे लोक बेफाम, बेभान झाले आहेत.अशावेळी उघड्या डोळ्याने पाहण्याशिवाय समाज काही करू शकत नाही.कारण काळाच्या ओघात समाजाच्या संवेदनाच आता बोथट झाल्या आहेत.
श्रीरंग काटेकर सातारा
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




