वाई वसंत व्याख्यानमालेच्या एकोणिसाव्या पुष्पात “आपल्या दैनंदिन जीवनात संत साहित्याची उपयुक्तता” या विषयावर व्याख्यान
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई वसंत व्याख्यानमालेच्या एकोणिसाव्या पुष्पात “आपल्या दैनंदिन जीवनात संत साहित्याची उपयुक्तता” या विषयावर ज्येष्ठ वक्ते रंगनाथ नाईकडे यांचे विचारप्रवर्तक व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. महेश मेणबुधले होते.
आपल्या व्याख्यानात रंगनाथ नाईकडे यांनी संत साहित्याची सामाजिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि व्यावहारिक उपयुक्तता उलगडून सांगितली. “परंपरा विकत मिळत नाही. वारकरी संप्रदायासारखी परंपरा लाभणे हे महाराष्ट्राचे भाग्य आहे. मी अनेक देश फिरलो; मात्र भारत आणि महाराष्ट्राची संस्कृती जगात श्रेष्ठ का ठरते, तर त्यामागे संतांचा मोठा वाटा आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यातही संत साहित्याची महत्त्वाची भूमिका आहे. भाषेतील सातत्य सिद्ध करण्यासाठी संत साहित्य हा मोठा पुरावा ठरला.
संत म्हणजे नदीच्या पात्रासारखे असतात. पाणी वाहते, बदलते; पण पात्र बदलत नाही. समाज सुजलाम-सुफलाम व्हावा हीच संतांची अपेक्षा असते. समाजसेवा ही संकल्पनाही भारतभूमीतच जन्माला आली. ‘न त्वहं कामये राज्यं…’ या श्लोकातून दुःखी लोकांच्या वेदना दूर करण्याची भावना व्यक्त होते.
धर्मशास्त्रांमध्ये चार प्रकारचे वृद्ध सांगितले आहेत- ज्ञानवृद्ध, वैराग्यवृद्ध, तपोवृद्ध आणि वयोवृद्ध. ज्ञानेश्वर माऊली हे ज्ञानवृद्धोत्तम होते. अवघ्या सतराव्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला. आजही त्या ग्रंथातील एका ओवीवर संशोधन केले जाते. संतांनी व्याख्यान आणि श्रोत्यांचे महत्त्वही सांगितले आहे. ‘वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोतेविण’ या ज्ञानेश्वरीतील ओवीतून श्रोत्याचे स्थान स्पष्ट होते.
जीवनातील प्रत्येक पैलूवर संत साहित्य मार्गदर्शन करते. समता, बंधुता, स्त्रीमुक्ती यांसारखी मूल्ये संविधानाच्या आधीच वारकरी संप्रदायाने स्वीकारली होती. ‘उंच नीच काही नेणे हा भगवंत’ या अभंगातून संत एकनाथ महाराजांनी समतेचा संदेश दिला. संत चोखामेळा, सावता माळी यांसारख्या संतांनी जातीभेद मोडून काढला.
तुकाराम गाथा ही प्रत्यक्ष जीवनानुभवांतून निर्माण झालेली आहे. संत साहित्य माणसाची विचारसरणी बदलण्याची ताकद ठेवते. बाबा महाराज सातारकर यांना मुलाच्या निधनानंतर ज्ञानेश्वरीतील ‘सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे’ ही ओवी सापडली आणि त्यातून त्यांना जगण्याची नवी दिशा मिळाली. आज आत्महत्येचे वाढते प्रमाण पाहता संत तुकाराम महाराजांचे ‘नलगे द्यावा जीव’ हे विचार अधिक महत्त्वाचे वाटतात.
संत साहित्य पर्यावरण, समाजरचना आणि मानसिक आरोग्य यांवरही भाष्य करते. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ या अभंगातून निसर्गाशी नाते सांगितले आहे. ‘नगरेचि रचावी, जलाशये निर्मावी’ या ओवीतून नगररचना आणि पर्यावरण संवर्धनाचा विचार मांडला आहे. शेवटी ‘मन करावे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ हा संत तुकाराम महाराजांचा संदेश प्रत्येकाने जीवनात जपावा,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील देशपांडे यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय सुभाष कळसे यांनी करून दिला. कौस्तुभ अरुण प्रभुणे आणि डॉ. शैलेंद्र धेडे , वरद हॉस्पिटल अँड आयसीयू सेंटर हे कार्यक्रमाचे प्रायोजक होते. व्याख्यानातून उपस्थितांना संत साहित्याचा जीवनाशी असलेला जिव्हाळ्याचा संबंध नव्या दृष्टीने अनुभवता आला.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



