केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा, वाखरी - कोर्टी-लक्ष्मीटाकळी-अनवली-मुंढेवाडी-देगाव या नवीन ४-पदरी रिंग रोडच्या डीपीआरसह निधीला तात्काळ मंजुरी
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलाणी)
पंढरपूर शहरांतर्गत होणारी जड वाहतुकीची कोंडी आणि वारकरी-स्थानिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे. आज केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री ना.श्री.नितीनजी गडकरी यांनी परिचारक यांच्या निवासस्थानी भेट दिली असता, या प्रस्तावित चार पदरी बाह्य वळण रिंग रोडचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या मार्फत करण्यात यावे अशी विशेष मागणी केली. या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून त्याला तात्काळ निधी मंजूर करण्याची घोषणा ना.गडकरी यांनी यावेळी केली.
वेणेगाव-पंढरपूर आणि पंढरपूर-मंगळवेढा या मार्गांवर सध्या आंतरराज्यीय जड वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. उत्तर भारताकडून अहिल्यानगर, करमाळा आणि टेंभुर्णी मार्गे येणारी मल्टी-एक्सल वाहने दक्षिण भारताकडे जाण्यासाठी पंढरपूर शहरातून प्रवास करतात. यामुळे शहरातील अंतर्गत रस्ते अपुरे पडत असून, दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा आणि स्थानिक वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला होता.
मा.आ.प्रशांत परिचारक यांनी ना.गडकरी यांच्याकडे वाखरी-कोर्टी-लक्ष्मीटाकळी-कासेगाव-अनवली-मुंढेवाडी ते देगाव या नवीन ४-पदरी बाह्यवळण रस्त्याची मागणी लावून धरली होती. हा रस्ता पूर्णपणे ग्रीन फिल्ड अलायमेंटनुसार होत असल्याने शहराबाहेरून जड वाहतूक वळवणे सुलभ होणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून आ.परिचारक या रिंग रोडसाठी केंद्र सरकारकडे मागणी करत होते. आज ना.गडकरी यांच्या दौऱ्याचे औचित्य साधून त्यांनी प्रत्यक्ष निवेदन सादर केले. पंढरपूरचे भौगोलिक महत्त्व आणि वारकऱ्यांची होणारी ओढाताण लक्षात घेता, हा रस्ता पंढरपूरच्या विकासात 'गेम चेंजर' ठरेल, असे परिचारक यांनी यावेळी पटवून दिले.
प्रशांत परिचारक यांच्या मागणीची दखल घेत ना.नितीन गडकरी यांनी संबंधित विभागाला या रस्त्याचा तातडीने डीपीआर तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. या निर्णयामुळे पंढरपूर शहर खऱ्या अर्थाने वाहतूक कोंडीमुक्त होणार असून भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. या महत्वपुर्ण निर्णयामुळे पंढरपूर शहरातील नागरिक व वारकरी संप्रदाय यांच्या कडून समाधान व्यक्त केले जात आहे.
यावेळी सोलापूर जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.श्री.जयकुमारजी गोरे साहेब, आ.समाधान दादा आवताडे व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




