साखर उत्पादनातून नफा मिळवणे अशक्य असल्याचे प्रतिपादन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
साखर कारखानदारांनी साखर उत्पादनावर भर न देता इथेनॉल निर्मिती वाढवणे गरजेचे आहे. फक्त साखर उत्पादनातून नफा मिळविणे आता अशक्य आहे. इथेनॉलचे उत्पादन वाढवून आगामी काळात साखर कारखानदारांनी स्वतःचे इथेनॉल विक्री पंप सुरू करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. किसनवीर कारखाना येथे आयोजित करण्यात आलेल्या देशभक्त आबासाहेब वीर कृतज्ञता पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी विधानसभा सभापती ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, मदत व पुनर्वसन मंत्री आणि किसनवीर कारखाना अध्यक्ष मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, खासदार नितीन पाटील, माजी मंत्री बालासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, प्रमोद शिंदे व मान्यवर उपस्थित होते.
देशात लवकरच 100% इथेनॉल इंधनावर वाहने धावणार
शेतकरी फक्त अन्नदाता नसून तो ऊर्जदाता आहे. तोच शेतकरी आता इंधनदाता झाला पाहिजे यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या जागतिक पर्यावरणदिनी ८०टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आम्ही बाजारपेठेत विक्रीकरिता दाखल करीत असून भविष्यात १०० टक्के इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती करण्याच्या सूचना वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांना दिल्या आहेत. शेतीकरिता वापरण्यात येणारी यंत्रसामुग्री इथेनॉल किंवा बायो- सीएनजी वर चालविण्यास शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल. हायड्रोजन आपले भविष्य असून त्याची किंमत १०० रुपयांपर्यंत आणता आली तर देश इंधन आयात करणारा देश नाही तर इंधन निर्यात करणारा देश निर्माण होईल. देशाबाहेर जाणारा पैसा वाचविणे ही खरी देशभक्ती असून वेस्ट इनटू वेल्थ ही व्याख्या शेतकऱ्यांनी आत्मसात केल्यास त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असा कानमंत्र उपस्थित शेतकऱ्यांना त्यांनी दिला. तसेच यापुढे शेती क्षेत्रात AI तंत्रज्ञानाचा वापर करून या उद्योगाला भविष्यात विकासाच्या वाटेने घेऊन गेले पाहिजे असे यावेळी त्यांनी सांगितले.
प्रारंभी कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील यांनी या पुरस्काराची उंची व पुरस्कार मूर्ती ना.नितीन गडकरी हा खरा संगम या परिसराला पाहिला मिळाला हे आमचे भाग्य असल्याचे सांगितले. तर राज्याचे सार्वजनिक मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी ना. गडकरी यांच्या कामाचा आवाका व नजरेतील विकासकामांचे नियोजन हे या राज्याच्या बांधकाम खात्याने अनुभवले असल्याचे सांगितले. तसेच यापुढे देशातील महामार्ग सुखकर करीत असताना माझ्या आणि मकरंद आबांच्या मतदार संघाकडे विशेष लक्ष देतील असा विश्वास व्यक्त केला.
स्वागत कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी केले व आभार कारखान्याचे संचालक दिलीप पिसाळ यांनी मानले. यावेळी कारखान्याचे सर्व संचालक, सभासद, विविध पक्षांचे मान्यवर व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




