राजकीय दबाव झुगारून पौड पोलीस न्याय देणार का? जनतेत कुजबुज
शिवशाही वृत्तसेवा, पुणे
पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मोठी बातमी समोर येत आहे. मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या भरधाव फॉर्च्युनर गाडीने एका रिक्षाला जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, रिक्षाचालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर फॉर्च्युनरमधील शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे यांच्यासह तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे हे आपल्या फॉर्च्युनर गाडीने जात होते. दरम्यान, त्यांच्या भरधाव फॉर्च्युनरने एका रिक्षाला प्रचंड वेगात धडक दिली. अपघाताचा आवाज एवढा मोठा होता की, परिसरातील स्थानिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली.
स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू करत अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, हा अपघात इतका भयानक होता की रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू झाला होता.
मृतक आणि जखमींची माहितीमृत रिक्षाचालक: विकास अर्जुन पारखीजखमी: शिवसेना ठाकरे गटाचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडे (डोक्याला किरकोळ दुखापत) आणि फॉर्च्युनरमधील अन्य दोन प्रवासी (किरकोळ जखमी).
जिल्हाध्यक्षांच्या चालकावर गुन्हा दाखल
या भीषण अपघातप्रकरणी मुळशीतील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतक रिक्षाचालकाचे नातेवाईक अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रकाश भेगडे यांच्या फॉर्च्युनर चालकाविरोधात निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पौड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
राजकीय दबावाचा संशय; जनतेत उलट-सुलट चर्चा
या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून, रिक्षा पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. गरीब रिक्षाचालक विकास पारखी यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, अपघातात मोठ्या राजकीय पक्षाचे नेते अडकले की पोलिसांवर दबाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, गुन्हा दाखल झाला असला तरी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भेगडे यांच्या राजकीय प्रभावापुढे आणि दबावापुढे झुकणार नाही का? पौड पोलीस या प्रकरणाचा प्रामाणिकपणे तपास करून त्या गरीब रिक्षाचालकाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील का? असा सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित केला जात आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




