२१ ते २५ मे दरम्यान नागा संन्यासींसह देशभरातील साधू-संतांची मांदियाळी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
अनेक ऋषीमुनींची तपोभूमी, ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या आपल्या पावन 'दक्षिण काशी'चे म्हणजेच वाई शहराचे महात्म्य संपूर्ण जगाच्या पाठावर पोहोचावे, या उदात्त हेतूने वाईत पहिल्यांदाच अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात 'लघु कुंभमेळा - २०२६' चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. वाई नगरपरिषद आणि 'लघु कुंभ सेवा समिती, शक्ती शिवगंगा अटल आश्रम' यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी दिनांक २१ मे ते २५ मे २०२६ या कालावधीत कृष्णाकाठच्या पवित्र महागणपती घाट येथे हा अभूतपूर्व सोहळा संपन्न होणार आहे.
या जागतिक दर्जाच्या सोहळ्याच्या नियोजनाची विस्तृत रूपरेषा जाहीर करण्यासाठी वाई नगरपालिकेत एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत, मदन गोसावी महाराज आणि मुख्य आयोजकांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पत्रकार परिषदेत माहिती देताना आयोजकांनी सांगितले की, "हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर या चार मुख्य कुंभमेळ्यांइतकेच वाईचे अथांग महात्म्य आहे. हा केवळ एक धार्मिक उत्सव नसून आजच्या तरुण पिढीला आपल्या महान संस्कृतीची व साधू-संतांच्या विचारांची ओळख व्हावी आणि विसरत चाललेल्या संस्कृतीचे पुनरुज्जीवन व्हावे, यासाठी उचललेले हे एक प्रामाणिक पाऊल आहे."
पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात अत्यंत मंगलमय वातावरणात गुरुवार दि. २१ रोजी गुरुपुष्यामृत योग छावणी भूमी पूजन व छावणी प्रवेश (सकाळी ११ वा.), शुक्रवार दि. २२ रोजी धर्मध्वजा आरोहण (सकाळी ११ वा.), शनिवार दि. २३ रोजी श्री विष्णूयाग – सार्वजनिक हवन, रविवार दि. २४ रोजी हिंदू महासभा व भव्य दिप प्रज्वलन (सायंकाळी ४ वा.), सोमवार दि. २५ रोजी नागा संन्यासी यांचे पावन स्नान, मान्यवर साधू-संत, आचार्य, महामंडलेश्वर व श्री महंत यांची भव्य रथ शोभायात्रा आणि महिला कलश शोभायात्रा. तसेच दररोज सायंकाळी ६:३० वाजता 'श्री कृष्णामाई आरती', असे विविध धार्मिक विधी पार पडणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या कुंभमेळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे देशभरातून येणारे विविध तपस्वी साधू-संत असणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्र पुरी जी महाराज, गिरनारचे पीठाधीश्वर, तसेच राजस्थान व दिल्ली येथील शनी देवस्थानचे पीठाधीश्वर उपस्थित राहणार आहेत. याशिवाय विविध विद्यांचे जाणकार, विद्वान, हठयोगी, खडेश्वरी, ऊर्ध्वबाहू आणि नागा संन्याशांची उपस्थिती या सोहळ्याची शोभा वाढवणार आहे. तसेच राज्याचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेतेमंडळी या सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेणार आहेत.
येणाऱ्या लाखो भाविकांचा विचार करता कुंभमेळा समितीने स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने चोख व्यवस्था केली आहे. संपूर्ण परिसरावर २४/७ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाईल. स्वतंत्र एंट्री आणि एक्झिट मार्ग, लाईव्ह अनाउन्समेंट सिस्टीम आणि आपत्कालीन मार्ग तयार करण्यात आले आहेत. येणाऱ्या सर्व साधू-संतांसाठी महाप्रसादाची व राहण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. चोवीस तास रुग्णवाहिका, अग्निशामक दल आणि वैद्यकीय मदत केंद्र सज्ज असेल. जे भाविक येऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी फेसबुक पेज, इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि युट्युब लाईव्हद्वारे सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाईल.
नगराध्यक्ष अनिल सावंत, मदन गोसावी महाराज आणि संपूर्ण अटल आश्रम, लघु कुंभ सेवा समिती व शिवगंगा टीमने रात्रंदिवस मेहनत घेऊन या सोहळ्याची तयारी केली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
दरम्यान, "दक्षिण काशीच्या या पवित्र भूमीत एवढी ताकद आहे की, येथे येणारा प्रत्येक भाविक एक सकारात्मक ऊर्जा घेऊन घरी परतेल. हा आपल्या परिसरासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. सर्व समाजबांधव, माता-भगिनी आणि तरुण मित्रांनी आपल्या सहपरिवारासह मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित राहून साधू-संतांचे दर्शन घ्यावे, महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनाचे कल्याण करावे," असे आवाहन नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




