प्रशासनाला अपघाताची प्रतीक्षा? - मेणवलीतील भीषण अपघातानंतरही प्रशासन ढिम्म, तर लोकप्रतिनिधींचेही मौन
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई शहराच्या वैभवात भर टाकणारी '२४ तास पाणी पुरवठा योजना' सध्या नागरिकांच्या जीवावर उठल्याचे चित्र दिसत आहे. शहरात ठिकठिकाणी पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, सुरक्षेच्या नियमांना हरताळ फासल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. खोदलेल्या रस्त्यांवर ना सावधानतेचे फलक आहेत, ना रात्री चमकणारे रिफ्लेक्टर. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावरच यंत्रणा जागी होणार का? असा जळजळीत सवाल वाईकर विचारत आहेत.
सुरक्षेचे नियम कागदावरच!
सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात असल्याने शहरात वाहनांची मोठी वर्दळ आहे. अशातच पाईपलाईनसाठी रस्ते खोदल्याने वाहतुकीसाठी जागा अत्यंत कमी उरली आहे. खड्डे मुजवतानाही त्यावर योग्य मातीकाम न केल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या वेळी या ठिकाणी कोणताही धोक्याचा इशारा देणारा बोर्ड नसल्याने वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. संबंधित विभाग याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
मेणवलीतील अपघाताने जिल्हा हादरला
दोन दिवसांपूर्वीच वाई-धोम रस्त्यावरील मेणवली हद्दीत स्वप्नपूर्ती मंगल कार्यालयासमोर दोन दुचाकींची भीषण धडक झाली. या अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ वर्षीय मुलगी मृत्यूशी झुंज देत आहे. या अपघाताचे मुख्य कारण रस्त्यावर झालेले अस्ताव्यस्त पार्किंग हेच होते. मंगल कार्यालयात येणाऱ्या वाहनांमुळे रस्ता अरुंद झाला आणि समोरून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्याने हा भीषण घात झाला.
लोकप्रतिनिधींचे ‘मौन’ कोणासाठी?
शहरात एवढ्या समस्या असताना आणि लोकांचा जीव धोक्यात असताना स्थानिक लोकप्रतिनिधींनी मात्र मौन धारण केले आहे. प्रशासनावर वचक निर्माण करण्याऐवजी लोकप्रतिनिधी गप्प का आहेत? ठेकेदार आणि प्रशासनाच्या या मनमानी कारभाराला नेमके कोणाचे पाठबळ आहे, याची चर्चा आता शहराच्या चौकाचौकात रंगू लागली आहे.
नागरिकांचा सवाल
"पाणी योजना विकासासाठी हवीच, पण ती लोकांचा जीव घेऊन कशाला? सुरक्षेचे नियम पाळणे ही कंत्राटदार आणि पालिकेची जबाबदारी नाही का? रात्री एखादा मोठा अपघात झाला तर त्याला जबाबदार कोण?"
प्रशासनाचा ढिम्म कारभार
स्थानिक ग्रामस्थांनी यापूर्वी पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे दोन संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अशीच परिस्थिती आता वाई शहरात निर्माण झाली असून, खोदकामामुळे अरुंद झालेल्या रस्त्यांवर आता प्रशासनाला आणखी किती बळी हवे आहेत, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




