गहू, ज्वारी, भाजीपाला व आंबा पिके आडवी; विजेचे खांब कोसळून वीजपुरवठा खंडित, तातडीच्या पंचनाम्याची मागणी
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई तालुक्यासह शहर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकरी व नागरिकांचे मोठे नुकसान केले आहे. बुधवारी दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांची पत्रे उडाली असून काही कुटुंबांचा संसार अक्षरशः उघड्यावर पडला आहे.
तालुक्यातील पसरणी, भोगाव ( नेहर वस्ती )आदी पश्चिम भागात वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका बसला असून घरांचे तसेच शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील गहू, ज्वारी, भाजीपाला तसेच आंबा पिके पूर्णपणे आडवी झाल्याने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
बागायती क्षेत्रात भाजीपाला पाण्यात बुडून नासण्याची शक्यता निर्माण झाली असून कोबीसारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी व ऊस पिके आडवी झाल्याने उत्पादनावर गंभीर परिणाम होणार आहे, तर भिजलेल्या गहू-ज्वारीचे धान्य काळवंडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंब्याच्या झाडांवरून मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने यंदाच्या हंगामावरही परिणाम होणार असल्याचे चित्र आहे.
या अवकाळी पावसाचा फटका केवळ शेतीपुरता मर्यादित नसून सरकारी मालमत्तेलाही बसला आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वाई शहरात तासन्तास वीजपुरवठा खंडित झाला. तसेच बांधकाम विभागाचे रस्ते खराब झाले असून झाडे उन्मळून पडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली.
विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सुसाट वाऱ्यामुळे नागरिक भयभीत झाले असून पाळीव जनावरांनाही या नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे. पावसामुळे शेतातील पाणी साचून ओढे-नाले भरून वाहत असल्याने परिस्थिती पावसाळ्यासारखी निर्माण झाली आहे.
अचानक कोसळलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून वर्षभराचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
दरम्यान, कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. हवामान खात्याने पुढील दोन दिवसही पावसाची शक्यता वर्तविल्याने तालुक्यातील नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




