सावज टप्प्यात आलं की कार्यक्रम करणारच - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा विरोधकांना इशारा

वाईत भाजपच्या लोकनियुक्त प्रतिनिधींचा भव्य नागरी सत्कार - विराज शिंदे प्रकरणावरून विरोधकांवर जोरदार प्रहार

Minister jaykumar gore, minister makrand Patil, BJP, Viraj Shinde, wai, satara, shivshahi news,

शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
“मी इथे कोणाची जिरवायला आलो नाही, तर आमच्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला आलो आहे. कोणाच्या नादाला लागू नका; पण आमच्या नादाला लागलात तर आम्ही सोडत नाही. सावज टप्प्यात आलं की कार्यक्रम करतोच,” अशा आक्रमक आणि रोखठोक भाषेत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या लोकनियुक्त प्रतिनिधींच्या भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन येथील भाजी मंडई, गणपती आळी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

‘विराज’च्या केसाला धक्का लावून दाखवा!
आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेताना मंत्री गोरे यांनी 'विराज प्रकरणा'चा थेट उल्लेख केला. “विराजच्या केसाला धक्का लावून दाखवा,” असे आव्हान देत त्यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. तसेच, यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा सोयीस्कर वापर करणाऱ्यांवर टीका करत त्यांनी सवाल केला की, “स्वतःवर प्रसंग आला की चव्हाण साहेब आठवतात; पण इतरांना त्रास देताना ते विचार कुठे जातात?”

संघर्ष आणि राजकीय प्रवासाचा पाढा
स्वतःच्या राजकीय प्रवासातील अडथळ्यांविषयी बोलताना गोरे म्हणाले, “२२ केसेस अंगावर घेऊन, अटक आणि जिल्हाबंदी सोसून मी इथपर्यंत पोहोचलो आहे. शेतकऱ्यांच्या पोरांना मान-सन्मान मिळायलाच हवा.” “जे पेरलं तेच उगवणार” आणि “इथंच केलं, इथंच फेडायचं” या शब्दांत त्यांनी नैतिकतेचा दाखला देत भाषणाची सांगता केली.

विकासाच्या नव्या वाटा: १० हजार कोटींचे प्रकल्प
यावेळी माजी आमदार मदन भोसले यांनी कार्यकर्त्यांच्या निष्ठेचे कौतुक केले. साखर उद्योग आणि पाणी प्रश्नावरून विरोधकांना लक्ष्य करतानाच, त्यांनी महाबळेश्वर तालुक्यातील १० हजार कोटींच्या हायड्रोइलेक्ट्रिक प्रकल्पाची माहिती दिली. यामुळे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच धोम धरणावर ‘वॉटर प्लेन’ प्रकल्पाची घोषणा करत पर्यटनाला नवी दिशा देण्याचा संकल्प मांडला.
‘दक्षिण काशी’चा कायापालट करणार: अनिल सावंत
नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी वाई शहराच्या विकासाचा 'रोडमॅप' सादर केला. पाणीपुरवठा, भुयारी गटार, नदी संवर्धन आणि बाजारपेठ विकासाच्या कामांतून वाईला खऱ्या अर्थाने 'दक्षिण काशी' म्हणून जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी १०० दिवसांच्या विशेष विकास आराखड्याची अंमलबजावणी लवकरच सुरू होईल, असेही त्यांनी नमूद केले.

दिग्गजांची मांदियाळी
या सोहळ्याला माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव गायकवाड, कृषी भूषण शशिकांत पिसाळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, वाई तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, डॉ. नितीन सावंत, नितीन भरगुडे-पाटील, आनंदराव शेळके, अनुप सूर्यवंशी यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक, महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी विविध नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. शशिकांत पिसाळ यांनी संयमी आणि विकासप्रधान राजकारणाचे महत्त्व अधोरेखित करत उपस्थितांचे आभार मानले.

-----------------------

shivshahi news, vardhapa din, shivshahi maharatn puraskar,

---------------------

----------------------------

गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा

   इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज  टेलीग्राम चॅनल  सबस्क्राईब करा

  व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

buttons=(Accept !) days=(30)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !