लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पाचवड, ता. वाई येथे 'प्रधानमंत्री जनमन योजने' अंतर्गत कातकरी समाजासाठी साकारत असलेल्या २१ घरकुल प्रकल्पाला आता खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे. पुणे विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन समाजबांधवांशी संवाद साधला. प्रशासकीय प्रमुखांच्या या दौऱ्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून घरकुलांचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण होण्याचे संकेत मिळाले आहे.
या महत्त्वपूर्ण भेटीदरम्यान वाईचे उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, गटविकास अधिकारी नारायण घोलप आणि पाचवडचे सरपंच महेश गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी सुरू असलेल्या बांधकामाची बारकाईने पाहणी केली. कामाचा दर्जा पाहून विभागीय आयुक्तांनी समाधान व्यक्त केले, मात्र त्याचवेळी 'एकही कुटुंब घरापासून वंचित राहू नये आणि बांधकाम वेळेत पूर्ण व्हावे, अशा कडक सूचनाही संबंधित विभागाला दिल्या.
केवळ कामाची पाहणी करून हे अधिकारी थांबले नाहीत, तर त्यांनी कातकरी वस्तीवरील नागरिकांशी थेट जमिनीवर बसून संवाद साधला. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या दौऱ्याचे औचित्य साधून परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले, ज्यातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
दरम्यान, "शासनाच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ जेव्हा गरजूंच्या दारापर्यंत पोहोचतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने विकास साध्य होतो. पाचवडमधील हा गृहप्रकल्प कातकरी बांधवांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवणारा ठरेल," अशी प्रतिक्रिया प्रशासकीय विभागाकडून यावेळी देण्यात आली.
पाचवडमधील या उपक्रमामुळे कातकरी समाजाला हक्काचे छप्पर मिळणार असून, या कामाच्या गतीमुळे संपूर्ण तालुक्यात महसूल आणि पंचायत समिती प्रशासनाचे कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




