रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचे नाते महत्त्वाचे - डॉ. अरविंद गायकवाड
शिवशाही वृत्तसेवा, छ.संभाजीनगर (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
"छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तिन्ही महामानवांनी आपापल्या काळात संपूर्ण समाजाच्या कल्याणासाठी कार्य केले. हे कार्य केवळ विशिष्ट समाजापुरते मर्यादित नसून ते समस्त मानवजातीसाठी आहे. म्हणूनच या महामानवांनी जोपासलेले विचारांचे नाते हे रक्ताच्या नात्यापेक्षाही श्रेष्ठ आणि महत्त्वाचे आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध वक्ते डॉ. अरविंद गायकवाड यांनी केले.
बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. गायकवाड बोलत होते.
महामानवांच्या कार्याचा गौरव
आपल्या भाषणात डॉ. गायकवाड पुढे म्हणाले की, "शेतकरी, कामगार आणि कास्तकारांसाठी झटणारा राजा म्हणून शिवछत्रपतींची ओळख आहे. सामाजिक रूढी, परंपरांना छेद देऊन शिक्षणाचा प्रसार करणाऱ्या महात्मा फुलेंच्या विचारांवर आधारित भारतीय राज्यघटनेत तरतुदी करण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले आहे. या तिघांच्याही विचारांची मूळ विचारधारा एकच असल्याने त्यांचे विचार अंगीकारणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल."
महिलांच्या प्रगतीचा आढावा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात आरोग्य उपसंचालक डॉ. कांचन वानरे यांनी महिलांसाठी बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. हिंदू कोड बिलापासून ते महिलांना मिळालेल्या समान हक्कांपर्यंतच्या प्रवासात बाबासाहेबांचे योगदान कसे अमूल्य होते, हे त्यांनी स्पष्ट केले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दयानंद मोतीपवळे होते. यावेळी आयु. डॉ. संतोष कडले, आनंद बाजूळगे आणि डॉ. प्रताप चाटसे यांनीही आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांना उद्बोधन केले.
कार्यक्रमास बहुजन अधिकारी-कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष मा. एस. आर. भोसले, उपाध्यक्ष प्रा. श्रीमंत कांबळे, अशोक साळवे आणि विनोद सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी श्रीमती जयश्री देबाजी यांनी राष्ट्रपुरुषांच्या जीवनकार्यावर आधारित स्वरचित कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
यशस्वी नियोजनासाठी परिश्रम
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद हरबडे, डॉ. बी. एन. मोरे, डॉ. डोंगळीकर, डॉ. चव्हाण, डॉ. अभिजित खंदारे, अनिल सानप, अविनाश दमघाये, अनिल बिडवे, संजय सागरे, श्रीमती मोरे, प्रशांत बागूल, विनोद खंडागळे, अनिल नरवडे, संदीप बागडे, अजय चिलकेवार, किशोर तायडे, प्रशांत भोसले, प्रमोद तोडकर, दादाराव गजहंस, श्री. गडकरी, ईराळे आदींनी मोलाचे सहकार्य केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भूषण रामटेके यांनी केले, सूत्रसंचालन किशोर वाघुले यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत चव्हाण यांनी मानले.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




