राज्यस्तरीय अधिवेशनात आमदार किशोर दराडे व विलास भुमरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान
शिवशाही वृत्तसेवा, छ.संभाजीनगर (प्रतिनिधी मनोज चव्हाण)
महाराष्ट्र राज्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सेनेचे पहिले देदीप्यमान राज्यस्तरीय अधिवेशन नुकतेच येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात मोठ्या उत्साहात पार पडले. या ऐतिहासिक अधिवेशनात संघटनेच्या संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात आला असून, फुलंब्री तालुका अध्यक्षपदी तातेराव शंकर बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले..
या अधिवेशनाला शिक्षक आमदार किशोर दराडे आणि पैठणचे आमदार विलास भुमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तातेराव बनसोडे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तातेराव बनसोडे यांच्या निवडीमुळे फुलंब्री तालुक्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध शाखांच्या पदाधिकारी आणि कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये फुलंब्री तालुक्याची धुरा तातेराव बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यासोबतच पदवीधर नोंदणी मोहिमेत मराठवाडा विभागात आघाडी घेण्याचा निर्धार सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी एकमुखाने व्यक्त केला.
मराठवाडा विभागाचे अध्यक्ष डॉ. संजय तायडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या अथक परिश्रमातून हे अधिवेशन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वी झाले. या अधिवेशनामुळे आगामी काळात शिक्षक सेनेची ताकद अधिक वाढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी संदीप काळे यांनी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तातेराव बनसोडे यांची निवड झाल्याबद्दल तालुक्यातील शिक्षक वर्गातून त्यांचे अभिनंदन होत असून, संघटना वाढीसाठी ते जोमाने प्रयत्न करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




