शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
गेल्या दीड-दोन वर्षांपासून रखडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या सुरूर-पोलादपूर रस्ते कामामुळे वाई तालुका आणि शहर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यावसायिकांचे जगणे असह्य झाले असून, आज 'सर्वपक्षीय बंद' आणि 'रास्ता रोको' आंदोलनाद्वारे वाईकरांनी आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनाची धग आता थेट मंत्रालयापर्यंत पोहोचली असून आजच यासंदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.
अनेक वेळा संबंधित मंत्र्यांची भेट घेतली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये एका भेटी दरम्यान मंत्र्यांनी कामाला गती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आता मार्च उजाडला तरी कामाची परिस्थिती जैसे थेच आहे. "जर हे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही, तर या भागातील अर्थकारणावर त्याचे गंभीर परिणाम होतील." रस्ते कामासाठी आवश्यक असलेल्या 'एनओसी' (NOC) आधीच घ्यायला हव्या होत्या, मात्र नियोजनाच्या अभावामुळे काम रखडले आहे. कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असून या संपूर्ण प्रकल्पाचे तातडीने ऑडिट करण्यात यावे. ७० ते ८० किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पातील केवळ १२ किलोमीटरचे काम पूर्ण होण्यासाठी जर दोन वर्षे लागत असतील, तर संपूर्ण काम कधी पूर्ण होणार? असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.
वाई आणि महाबळेश्वर परिसरातील ८० टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे स्ट्रॉबेरी, गहू आणि ज्वारी यांसारख्या पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांना दमा, उच्च रक्तदाब आणि श्वसनाचे गंभीर विकार जडत आहेत. खोदकामामुळे किसन वीर कॉलेजला जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पाचगणी-महाबळेश्वर या जागतिक पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या या मार्गावरील हॉटेल व्यावसायिक आणि छोटे स्टॉलधारक हवालदिल झाले आहेत. पर्यटकांची संख्या घटल्याने आर्थिक गणिते कोलमडली असून, बँकांचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे.
यशवंतनगर येथील सह्याद्रीनगर टिकाटने येथे झालेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. "आम्ही प्रशासनाचा आदर करतो, पण आमच्या सोशिकतेचा अंत पाहू नका," असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. रस्ते कामाच्या ठिकाणी रिफ्लेक्टर्स किंवा सूचना फलक नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. येत्या १५ दिवसांत कामात प्रगती न दिसल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून जनशक्ती एकवटून 'नॅशनल हायवे' रोखण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला आहे.
रस्ता खराब असल्याने पुणे-वाई एसटी तिकीट दरवाढ आणि प्रवासात एक तासाचा विलंब होत आहे. पी.डब्ल्यू.डी. च्या पत्रालाही कंत्राटदार जुमानत नसल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. शिरवळ-खंडाळ्याच्या तुलनेत वाईचा विकास का खुंटला? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत दुकाने बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, मात्र उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर असल्याचेही नमूद केले.
आता या आंदोलनानंतर मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो आणि प्रत्यक्षात रस्त्याचे काम कधी वेगाने सुरू होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
'बंद' की पोरखेळ? शटर उघडायच्या आत बंद संपला; आंदोलनाचे 'विचित्र' टायमिंग!
सुरूर-पोलादपूर रस्ते कामाच्या विलंबाविरोधात आज पुकारण्यात आलेला 'वाई तालुका बंद' म्हणजे निव्वळ 'इव्हेंट मॅनेजमेंट' होता की काय, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. सकाळी ६ ते दुपारी १२ या वेळेत बंदचे आवाहन करण्यात आले होते, मात्र यात नियोजनाचा पूर्णतः अभाव दिसून आला.
वाईची बाजारपेठ मुळात ९-१० वाजता उघडते, मग सकाळी ६ वाजल्यापासूनच्या बंदचा फायदा काय? दुकानदारांनी शटर उघडण्यापूर्वीच 'बंद' संपला, मग हा लढा नेमका कोणासाठी होता? दोन तासांत काय साध्य झाले? फक्त दोन तासांच्या नावापुरत्या आंदोलनाने रस्त्यांवरील खड्डे बुजणार आहेत की सरकारला जाग येणार आहे? हा बंद जनतेच्या रोषाला वाट करून देण्यासाठी होता की आंदोलनाचे 'समारोप' उरकण्यासाठी? अशा प्रश्नांची चर्चा वाईकरांमध्ये चांगलीच रंगलेली पाहायला मिळाली.
किसनवीर चौकात कॅमेऱ्यासमोर आंदोलनाच्या घोषणा होत असताना, शहराच्या इतर भागात काही दुकाने राजरोस सुरू होती. एका बाजूला बंदचे आवाहन आणि दुसऱ्या बाजूला सुरू असलेली विक्री, यावरून हे आंदोलन केवळ 'दिखावा' असल्याचे स्पष्ट होते.
सुरूर-पोलादपूर रस्ते कामातील दिरंगाई, रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात जाणारे निष्पाप बळी हे वास्तव असताना, अशा 'टाईमपास' आंदोलनांनी प्रशासनावर दबाव येईल का? दोन तासांचा बंद पाळून कोणाचे समाधान झाले? जनतेच्या भावनांशी असा खेळ थांबवून आता तरी ठोस कृती होणार का? असे संतप्त सवाल सामान्य नागरिक विचारताना दिसत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




