कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास आराखड्याची अंमलबजावणी; अतिक्रमणे हटवण्यासाठी विशेष मोहिमेचे आदेश
शिवशाही वृत्तसेवा, वैजापूर (प्रतिनिधी अनिल सुर्यवंशी)येणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वेरूळ येथील श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरात नियोजित विकासकामे तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. या विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना सर्व संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय राखून उपाययोजना संयुक्तपणे राबवाव्यात, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी अपराजिता अग्निहोत्री, उपजिल्हाधिकारी संगिता राठोड, पुरातत्व विभागाचे शिवकुमार भगत, पोलीस निरीक्षक डी. आर. फराटे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पर्वणीपूर्वी कामांना गती देण्याचे आदेश
कुंभमेळ्यानिमित्त प्रत्यक्ष पर्वणी सुरू होण्यापूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. या कामांची पूर्वतयारी म्हणून सर्व विभागांनी आतापासूनच प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. यामध्ये रस्ते, भाविकांच्या सोयी-सुविधा आणि परिसराचे सौंदर्यीकरण यावर भर दिला जाणार आहे.
अतिक्रमणधारकांवर कारवाईचे संकेत
मंदिर परिसरातील विद्रुपीकरण थांबवण्यासाठी आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी परिसरातील अतिक्रमणे काढण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली आहेत.
ग्रामपंचायतीमार्फत तात्काळ उपाययोजना करून अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात याव्यात.महसूल, पोलीस आणि पुरातत्व विभागाने संयुक्त मोहीम राबवून अतिक्रमणे हटवावीत.स्थानिक प्रशासनाने अतिक्रमणधारकांशी संवाद साधून त्यांना विश्वासात घ्यावे, जेणेकरून कामात अडथळा येणार नाही.
प्रशासकीय समन्वय महत्त्वाचा
या बैठकीत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभागाने केलेल्या नियोजनाचाही आढावा घेण्यात आला. पुरातत्व विभागाने जतन आणि संवर्धनाच्या कामांबाबत माहिती दिली. कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी लाखो भाविक वेरूळमध्ये दाखल होणार असल्याने, त्यांच्या सुलभ प्रवासासाठी आणि निवासासाठी प्रशासकीय यंत्रणांनी आतापासूनच 'मिशन मोड'वर काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




