बेकायदा दलाली जोरात; प्रशासनाचे दुर्लक्ष, सामान्यांची आर्थिक लूट
शिवशाही वृत्तसेवा,वाई (प्रतिनिधी शुभम कोदे )
दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरात सध्या घरदलालांनी (इस्टेट एजंट) अक्षरशः उच्छाद मांडला आहे. शहराच्या गल्लीबोळासह, अपार्टमेंट्स आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये भाड्याने मिळणाऱ्या खोल्यांवर या दलालांनी आपली 'नजर' ठेवली असून, भाडेकरूंकडून भरमसाठ कमिशन उकळले जात आहे. या प्रकारामुळे शिक्षणासाठी आणि रोजगारासाठी बाहेरून आलेल्या गरीब नोकरदार वर्गाची मोठी आर्थिक लूट होत असून, हे दलाल मात्र स्वतःची तिजोरी भरण्यात मग्न आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एखादी खोली किंवा घर भाड्याने हवे असल्यास हे दलाल भाडेकरूकडून चक्क एका महिन्याचे पूर्ण भाडे 'कमिशन' म्हणून मागत आहेत. घरमालकाला केवळ भाडे आणि डिपॉझिट मिळते, परंतु कोणताही कष्ट न करता केवळ माहिती देण्याच्या नावाखाली हे दलाल हजारो रुपये लाटत आहेत. व्यवसायानिमित्त किंवा मुलांच्या शिक्षणासाठी वाईत स्थायिक होऊ पाहणाऱ्या कुटुंबांना या नाहक आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे.
जर एखाद्या भाडेकरूने थेट घरमालकाशी संपर्क साधून खोली मिळवण्याचा प्रयत्न केला, तर हे दलाल त्यामध्ये हस्तक्षेप करून वादावादी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. "आमच्याशिवाय घर कसे काय मिळते ते बघतोच," अशा प्रकारची धमकीवजा भाषा वापरली जात असल्याने भाडेकरू दहशतीखाली आहेत.
धक्कादायक बाब म्हणजे, वाई शहरात कार्यरत असलेल्या बहुतांश दलालांकडे हा व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही कायदेशीर परवाने नाहीत. शासनाचे नियम धाब्यावर बसवून हा बेकायदा दलालीचा बाजार राजरोसपणे सुरू आहे. या दलालांच्या जाचातून सामान्य नागरिकांची सुटका करण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागाने तातडीने लक्ष घालून या अनधिकृत एजंटांवर कठोर कारवाई करावी. तसेच शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेरून येणारा माणूस वाईच्या अर्थचक्राला गती देत असतो. मात्र, याच लोकांची दलालांकडून होणारी लूट शहराच्या प्रतिमेला काळीमा फासणारी आहे. प्रशासनाने यावर वेळीच लगाम घालावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




