२० वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारविरुद्ध एल्गार; मंत्री उदय सामंत यांना दिले निवेदन
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंट प्रेस फेडरेशनने आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. वाई येथील शासकीय मुद्रणालयाच्या प्रवेशद्वारावर २० ते २४ फेब्रुवारी दरम्यान दररोज दोन तास निदर्शने करून सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनाची पुढची पायरी म्हणून उद्या, २५ फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व शासकीय मुद्रणालयांत एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
शासकीय मुद्रणालयातील कामगारांचे प्रश्न गेल्या २० वर्षांपासून सुटलेले नाहीत. यामध्ये प्रामुख्याने अनेक वर्षांपासून रिक्त असलेल्या पदांची तातडीने भरती, मुद्रण यंत्रसामग्रीचे आधुनिकीकरण व सुधारणा, दुसरा व चौथा शनिवार सुटी लागू करणे, मुद्रण भत्त्यामध्ये वाढ आणि वेतनातील तफावत दूर करणे तसेच नवीन सेवा प्रवेश नियम व रखडलेल्या पदोन्नती मार्गी लावणे. या मागण्यांचा समावेश आहे.
आंदोलनादरम्यान कामगारांच्या भावना आणि मागण्यांचे सविस्तर निवेदन मराठी भाषा आणि औद्योगिक विकास मंत्री ना. उदय सामंत यांना देण्यात आले. राज्य सरकारच्या उदासीन भूमिकेमुळे कामगारांमध्ये प्रचंड असंतोष असून, सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन पुकारल्याचे यावेळी सांगण्यात आले.
फेडरेशनचे प्रतिनिधी सुदन कांबळे आणि संघटनेचे अध्यक्ष सागर राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी निलेश साळुंखे, शंकर इथापे, पिसाळ यांच्यासह सर्व सभासद आणि कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान , "२० वर्षांपासून आम्ही केवळ आश्वासनांवर काम करत आहोत. आता संयम सुटला आहे. जर उद्याच्या लाक्षणिक संपावरही सरकारने दखल घेतली नाही, तर भविष्यात अधिक तीव्र लढा दिला जाईल," असा इशारा कर्मचारी प्रतिनिधींनी दिला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




