आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मान पांचगणी शहरास मिळाल्याने जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
महाराष्ट्र जयशासनाचे पर्यटन संचालनालय आणि हाय फ्लाय पॅराग्लायडिंग, पांचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पांचगणी येथे ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे आज उत्साहात उद्घाटन करण्यात आले. आतापर्यंत प्रामुख्याने युरोपीय देशांमध्ये आयोजित होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मान यंदा प्रथमच आपल्या देशातील पांचगणी शहरास मिळाल्याने जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
जगातील सुमारे २५ देशांतील २०० नामांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेच्या परीक्षणासाठी पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप असोसिएशनचे अध्यक्ष गोरान यांच्यासह जागतिक दर्जाचे तज्ञ पंच उपस्थित आहेत.
कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे पांचगणीची ओळख केवळ पर्यटन स्थळ म्हणून मर्यादित न राहता जागतिक स्तरावरील ‘पॅराग्लायडिंग हब’ म्हणून निर्माण होईल.
या प्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील. १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास पांचगणी नगरपालिकेचे अध्यक्ष दिलीप बगाडे, दांडेघर गावच्या सरपंच सृष्टी खरात, माजी सरपंच शंकर कळंबे, नगरसेवक परवीन मेमन, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, सुप्रिया माने तसेच पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप असोसिएशनच्या टेक्निकल टीममधील कृष्णकांत भागरा, दोहरा आदी मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा १५ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान पार पडणार असून पांचगणीकरांसह पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
पाहुण्यांचे स्वागत व आभार हाय फ्लाय पॅराग्लायडिंग चे चेअरमन अनुपम जाधव पाटील यांनी केले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




