आदित्य धुमाळचाही विशेष सन्मान
शिवशाही वृत्तसेवा, कन्नड (प्रतिनिधी मनोज चव्हाण)स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून कालीमठ (ता. कन्नड) येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्री संत ज्ञानेश्वर विद्या मंदिर, शिवनगर च्या विद्यार्थ्यांनी आपल्या वक्तृत्व कौशल्याची छाप पाडत देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेची विद्यार्थिनी आकांशा दलपत चव्हाण हिने ३३ स्पर्धकांमधून चतुर्थ क्रमांक पटकावत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
प्रभावी मांडणी आणि परीक्षकांची दाद
स्वामी प्रणवानंद माध्यमिक विद्यालय येथे पार पडलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला होता. आकांक्षा चव्हाण हिने आपल्या प्रभावी आवाजात आणि मुद्द्यांच्या अचूक मांडणीमुळे परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तिच्या या यशाबद्दल तिला १००१ रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
आदित्य धुमाळची छाप
याच स्पर्धेत शाळेचा दुसरा विद्यार्थी आदित्य शरद धुमाळ यानेही अतिशय ओघवत्या भाषेत आपले विचार मांडले. त्याच्या प्रभावी सादरीकरणामुळे त्याला प्रमाणपत्र व मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. दोन्ही विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शिवनगर परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
संस्थाचालक व शिक्षकांकडून कौतुक
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष साबुसिंग राठोड, उपाध्यक्ष रामदास सुरडकर, सचिव पांडुरंग राठोड, सहसचिव संजय पुरी, कोषाध्यक्षा सरला सोनवणे, संचालक शिवाजी वाघ, संचालक मुकुंद शिंदे तसेच मुख्याध्यापक प्रकाश जिरेमाळी यांनी विद्यार्थ्यांचे, त्यांच्या पालकांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
"अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमधील स्टेज डेअरिंग आणि आत्मविश्वास वाढतो. आमच्या शाळेच्या सांस्कृतिक परंपरेत या विद्यार्थ्यांनी मोलाची भर घातली आहे," अशी भावना संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




