वाई न्यायालयाचा निकाल
शिवशाही वृत्तसेवा, वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाचा खून करून मृतदेह कॅनॉलमध्ये टाकल्याप्रकरणी वाई पोलीस ठाणे हद्दीतील आरोपीस न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
वाई पोलीस ठाणे भाग-५ गुन्हा रजिस्टर क्रमांक २१/२०१८ भा.दं.वि. कलम ३०२, २०१ अन्वये दि. २४ जानेवारी २०१८ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी रूपेश उर्फ पप्पू शिवाजी चव्हाण (रा. अभेपुरी, ता. वाई) यास अरुण नामदेव मोहिते व त्याच एका मुलीशी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. त्याच रागातून आरोपीने अरुण मोहिते याच्या डोक्यात मारहाण करून खून केला व मृतदेह कपड्यांसह कॅनॉलच्या वाहत्या पाण्यात फेकून दिल्याची फिर्याद मयताचा भाऊ अक्षय नामदेव मोहिते याने दिली होती.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक येडगे यांनी करून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. सदर खटल्याची सुनावणी मा. श्री. आर. एन. मेहरे, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, वाई यांच्या न्यायालयात पूर्ण झाली. सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. ए. आर. कुलकर्णी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. या प्रकरणात एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले.
परिस्थितीजन्य पुरावे, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची साक्ष व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप व २५ हजार रुपये दंड, तसेच कलम २०१ अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मयताच्या आईस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
या प्रकरणात उपविभागीय पोलीस अधिकारी वाई श्री. साळुंखे, पोलीस निरीक्षक शहाणे व सपोनि येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार कदम (ब.नं. २००८) यांनी काम पाहिले. तसेच पोलीस प्रॉसिक्युशन स्कॉडचे अधिकारी व अंमलदारांनी प्रभावी मदत केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



