शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य तर्फे श्री किल्ले वैराटगड येथे दिमाखदार सोहळा संपन्न
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पत्रकारितेच्या माध्यमातून गेली ३० वर्षे अविरत सामाजिक कार्य आणि शिवछत्रपतींच्या वंशजांच्या तीन पिढ्यांची निष्ठापूर्वक केलेली 'शिवसेवा' यांचा यथोचित गौरव करत, जेष्ठ पत्रकार महेंद्र (आबा) जाधव यांना यंदाचा मानाचा 'शिवक्रांती शिवभूषण' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने श्री किल्ले वैराटगड येथे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
हा सोहळा नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ह.भ.प. प्रविण महाराज शेलार, महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराजांचे उत्तराधिकारी शिवदत्त मठाच्या महंत शिवदत्त कवितागिरी पांचाळ, नगरसेविका सीमा भोसले, सरपंच सौ. अमृता जाधव आणि राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या नेत्या सौ. रूपालीताई भिसे आदि मान्यवरांच्या हस्ते महेंद्र जाधव यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
उपस्थित मान्यवरांनी महेंद्र जाधव यांच्यासह सर्व पुरस्कार्थींचे अभिनंदन केले. तसेच, शिवक्रांती हिंदवी सेना महाराष्ट्र राज्य या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री स्वप्नील धनावडे व शिवश्री प्रविण कदम यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या 'दुर्ग संवर्धन' आणि 'सामाजिक' कार्याचा गौरव केला. संस्थेच्या या विधायक कार्यात सदैव खंबीरपणे पाठीशी राहण्याची ग्वाही देखील यावेळी मान्यवरांनी दिली.
या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने सागर धनावडे (अध्यक्ष, भा.ज.प. युवा मोर्चा) जयदीप शिंदे (संचालक, जावली बाजार समिती) ऍड. अनिल सोनमळे (अध्यक्ष, सरपंच परिषद)
महेश पवार ('बघा बघा' फेम पत्रकार) मंगेश गायकवाड (सरपंच) व दिनेश गायकवाड (उपसरपंच) आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
किल्ले वैराटगडच्या पावन सानिध्यात पार पडलेल्या या सोहळ्यामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण होते. ३० वर्षांच्या तपस्येचे फळ मिळाल्याची भावना व्यक्त करताना महेंद्र (आबा) जाधव म्हणाले, "आज 'शिवक्रांती शिवभूषण' पुरस्कार स्वीकारताना मन अत्यंत भावूक झाले आहे. पत्रकारितेच्या आणि शिवसेवेच्या प्रवासात आज ३० वर्षे पूर्ण होत असताना, हा सन्मान केवळ माझा नाही, तर माझ्या लेखणीने मांडलेल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिवप्रेमींचा आहे.
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे भाग्य म्हणजे शिवछत्रपतींच्या वंशजांच्या तीन पिढ्यांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. ही केवळ 'शिवसेवा' नसून माझ्यासाठी एक भक्ती आहे. किल्ले वैराटगडच्या पावन मातीत, जिथे इतिहासाचे वारे वाहतात, तिथे हा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा क्षण आहे.
हा प्रवास सोपा नव्हता, पण स्व. श्रीमंत छत्रपती अभयासिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांचा परिसस्पर्श आणि श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले तथा महाराजसाहेब यांचे मार्गदर्शन यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकलो. पत्रकारिता करताना कधीही तत्त्वांची तडजोड केली नाही आणि शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. हा पुरस्कार मला भविष्यात अधिक जोमाने सामाजिक कार्य करण्याची आणि दुर्ग संवर्धनाच्या चळवळीला बळ देण्याची ऊर्जा देणारा आहे. शिवक्रांती हिंदवी सेनेचे मी मनापासून आभार मानतो."
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




