वाई शेती उत्पन्न बाजार समितीचा पुढाकार - पाणी, दिवाबत्ती व स्वच्छतेची विशेष सोय
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली आणि सातारा जिल्ह्यातील सुप्रसिद्ध अशी वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील मौजे वेलंग (ता. वाई, जि. सातारा) येथे जनावरांचा जंगी वार्षिक बाजार दि. २१ फेब्रुवारी ते १ मार्च दरम्यान भरविण्यात येणार आहे. या वार्षिक बाजाराकडे जिल्ह्यासह राज्यभरातील शेतकरी व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
यात्रेनिमित्त सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर तसेच कर्नाटक राज्यातील व्यापारी मोठ्या संख्येने या बैल बाजारास भेट देतात. पंधरा दिवस चालणाऱ्या या बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असून, उत्कृष्ट जातीच्या जनावरांची खरेदी-विक्री येथे केली जाते.
यात्रेनिमित्त येणाऱ्या जनावरांसाठी तसेच नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व दिवाबत्तीची विशेष सोय वाई शेती उत्पन्न बाजार समितीमार्फत करण्यात येणार आहे. बाजार परिसरात स्वच्छता, सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्थेबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.
या बाजारात नामांकित व उत्कृष्ट जनावरांची निवड करून त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. निवड झालेल्या जनावरांना दि. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत आयोजित बक्षीस समारंभात पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
शेतकरी व व्यापाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असून, सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वाई शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




