गौरीशंकर लिंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांच्या नवसंशोधनाला यश
शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )
डोळ्याच्या विविध आजाराने त्रस्त असणाऱ्या असंख्य रुग्णांना विशेषता काचबिंदू झालेल्या रुग्णांना आता बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या आयड्रॉप पेक्षा अधिक प्रभावी व परिणामकारक ठरणाऱ्या औषधांचे नव संशोधन गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील अंतिम वर्ष एम फार्मसी मधील गीतांजली होले, कोमल इचके, स्वराली भगत, ओमकार कानडे, श्रद्धा पवार या विद्यार्थ्यांनी सखोल संशोधन केले आहे. या नाविन्यपूर्ण औषधांची परिणामकारकता सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या प्रोजेक्टची भारत सरकारच्या सी.आय आय.ए. मुंबई या संस्थेने निवड केली आहे. केंद्र सरकारच्या नवकल्पना नवनिर्मिती व नव संशोधन धोरणानुसार नाविन्यपूर्ण संशोधन करण्यासाठी महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.
विविध क्षेत्रात काळानुसार घडणारे बदल व आवश्यक नवनिर्मिती हे धोरण केंद्र सरकारचे असल्याने अशा उपक्रमांना शासन स्तरावर नेहमीच चालना दिले जाते. यामधून निर्माण झालेले नव संशोधन समाजासाठी उपयुक्त ठरत असते. गौरीशंकर च्या एम फार्मसी लिंब मधील विद्यार्थ्यांनी औषध निर्माण शास्त्र शाखेत नाविन्यपूर्ण संशोधनाचे ध्येय ठेवून काचबिंदू या आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना दिलासा देण्यासाठी क्युबोजोमल जेलची निर्मिती केली आहे. या जेलची औषध निर्माण क्षेत्रातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपनी व तज्ञांनी दखल घेतली आहे.
डोळ्यातील निर्माण होणाऱ्या काचबिंदुने त्रस्त असणाऱ्या रुग्णांसाठी आता हे औषध एक वरदान ठरेल असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रात व्यक्त केला जात आहे. सध्या बाजारात काचबिंदूवर उपलब्ध असणारे औषध हे डोळ्याच्या वरच्या भागापर्यंतच पोहोचत असल्याने काचबिंदू ने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते परंतु गौरीशंकर लिंब फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेले जेल हे डोळ्याच्या पेशीत अधिक वेळ संपर्कात राहते तसेच खोलवर भागापर्यंत सहजपणे पोहोचत असल्याने या जेलची परिणामकारकता अधिक असल्याचे तज्ञांचे मत आहे. त्यामुळे डोळ्याच्या संबंधी विविध आजार दूर होण्यास मदत होण्यासाठी विद्यार्थ्यांनी क्युबोओजल जेल ची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण नव संशोधन करून महाविद्यालयाच्या शैक्षणिक शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. असे मत संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप यांनी व्यक्त करून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांना एम फार्मसी विभाग प्रमुख डॉ धैर्यशील घाडगे यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप उपाध्यक्ष मिलिंद जगताप संचालक डॉ अनिरुद्ध जगताप जयवंतराव साळुंखे आप्पा राजगे प्रशासकीय अधिकारी नितीन मुडलगीकर जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर प्राचार्य डॉ संतोष बेल्हेकर, रजिस्टर निलेश पाटील यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
क्रिएटिव्ह आयडियाज व इनोव्हेशन्स संस्था वरळी मुंबई येथे देशभरातील विविध औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले प्रोजेक्ट सादर केले होते परंतु गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव संशोधन प्रोजेक्टची दखल घेतली आहे. नेत्रतज्ञ डॉक्टरांच्या मते विद्यार्थ्यांनी निर्मिती केलेले जेल हे काचबिंदू आजाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांच्या या नवनिर्मितीबद्दल सर्व स्तरातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. जेल ठरणार काचबिंदू रुग्णांसाठी वरदान.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




