अवैध पिस्टलसह १९ वर्षीय तरुण जेरबंद
शिवशाही वृत्तसेवा,सातारा ( प्रतिनिधी शुभम कोदे )
दि. १६ फेब्रुवारी २०२६ – महाराष्ट्र पोलीस अंतर्गत शाहुपुरी पोलीस ठाणे येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक करून मोठी कारवाई केली आहे. आरोपीकडून १ देशी बनावटीची पिस्टल व ४ जिवंत काडतुसे असा एकूण २,१७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
सातारा शहरात अवैधरित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचनेनुसार दि. १५ फेब्रुवारी रोजी पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार शाहुपुरी चौक येथे सापळा रचण्यात आला. बातमीतील वर्णनानुसार एक इसम मोपेडवरून मोळाचा ओढा रोडने जाताना दिसून आला. पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला असता तो पळू लागला. त्याचा पाठलाग करून मोळाचा ओढा येथील बबनदा हॉटेल परिसरात त्याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव स्वराज धनंजय अहीरे (वय १९ वर्षे, रा. ७२, महादरे रोड, सातारा) असे सांगितले. दोन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडे कमरेला खोचलेली देशी बनावटीची मॅगझिनसह पिस्टल आढळून आली. शस्त्र बाळगण्याबाबत कोणताही परवाना नसल्याचे त्याने कबूल केले.
या कारवाईत आरोपीकडून पिस्टल व ४ जिवंत काडतुसे असा एकूण २,१७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सचिन म्हेत्रे तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




