शिक्षण, युवक व नेतृत्वाचा प्रश्न केंद्रस्थानी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
यशवंत नगर गटातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून, सागर पवार यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताच गटात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करताना मोठ्या संख्येने मित्रपरिवार, युवक, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते व समर्थक उपस्थित असल्याने या उमेदवारीकडे लक्ष वेधले गेले आहे. विशेष म्हणजे शिक्षण, समाजकारण, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा दर्शवला.
या निवडणुकीत चर्चा केवळ उमेदवारांपुरती मर्यादित न राहता, शिक्षणाचा दर्जा, युवकांचे भविष्य आणि स्थानिक नेतृत्वाची जबाबदारी या मूलभूत मुद्द्यांवर केंद्रित होताना दिसत आहे. ग्रामीण भागातील शैक्षणिक प्रश्न, शाळांची अपुरी भौतिक सुविधा, शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा अभाव तसेच क्रीडा व सांस्कृतिक व्यासपीठांची कमतरता यामुळे पालक व युवकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
यशवंत नगर गटातील अनेक गावांमध्ये या प्रश्नांकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याची भावना असून, राजकारण केवळ सत्तेसाठी न राहता शिक्षण व समाजघडणीसाठी वापरले गेले पाहिजे, अशी स्पष्ट अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नवे नेतृत्व म्हणून सागर पवार यांचे नाव चर्चेत आहे. सागर पवार हे श्री शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज दहीहंडी उत्सव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून, त्यांनी संस्थेच्या माध्यमातून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता क्रिकेट स्पर्धा, युवकांसाठी विविध उपक्रम, सामाजिक सहकार्य व शैक्षणिक जनजागृतीचे कार्यक्रम सातत्याने राबवले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख केवळ कार्यक्रमपुरत्या नेत्याऐवजी समाजाशी थेट जोडलेले नेतृत्व अशी निर्माण झाली आहे.
राजकीयदृष्ट्या पाहता, यशवंत नगर गटात आजही “विकास नेमका कोणासाठी झाला?” हा प्रश्न कायम आहे. शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद प्रतिनिधींची भूमिका प्रभावी ठरली का, याबाबत मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे. केवळ निवडणुकीपुरते दिसणारे नेतृत्व आणि प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व यातला फरक मतदार आता स्पष्टपणे ओळखू लागले आहेत.
वाई तालुक्यात भाजपसमोरही एक महत्त्वाचा वैचारिक प्रश्न उभा राहिला आहे. दीर्घकाळ निष्ठेने काम करणाऱ्या जुन्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवायचा की वाढत्या राजकीय ‘इनकमिंग’ला प्राधान्य द्यायचे, हा निर्णय केवळ संघटनात्मक न राहता वैचारिक ठरणार आहे. शिक्षण, युवक व समाजकारणाशी जोडलेले नेतृत्व पुढे आणायचे की केवळ आकडेमोडीच्या राजकारणात अडकायचे, हा प्रश्न आता उघडपणे चर्चेत आहे.
यशवंत नगर गटातील अनेक पालक, शिक्षक व युवकांमध्ये “आता प्रश्न मांडणारेच नव्हे, तर उत्तर देणारे नेतृत्व हवे” अशी भावना बळावत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सत्ता बदलापुरती न राहता, शिक्षण, समाज आणि भावी पिढ्यांच्या दिशेचा निर्णय ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
या पार्श्वभूमीवर जर सागर पवार यांच्यासारख्या सामाजिक, सांस्कृतिक व युवकांशी जोडलेल्या नेतृत्वावर विश्वास दाखवला, तर यशवंत नगर गटात नवा राजकीय व वैचारिक प्रवाह निर्माण होऊ शकतो, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



