आढळराव पाटील शिवसेनेत परतणार?
शिवशाही वृत्तसेवा, शिरूर ( प्रतिनिधी फैजल पठाण )
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील मूळचे शिवसैनिक शिवसेनेत फूट पडल्यानंतर ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले होते. दरम्यान राष्ट्रवादीतही फूट पडून अजित पवार हे भाजप सोबत आले. २०२४ लोकसभा निवडणुकीत शिरूर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटली. तेव्हा राजकीय अपरिहार्यता म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा त्यांनी जनतेशी आपली असलेली नाळ तुटू दिली नाही. त्यांनी खासदार असताना सुरू केलेला जनता दरबार आजही अखंड सुरू आहे. तसेच शिवसैनिकांची असलेले त्यांचे नाते आबाधीत आहे. नुकतीच शिरूर नगर परिषदेची निवडणूक झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळाले आणि ऐश्वर्या पाचरणे नगराध्यक्ष झाल्या. त्यांच्या पदग्रहण सोहळ्याला माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उपस्थित होते. त्यावेळी शिवसैनिकांनी त्यांना पुन्हा शिवसेनेत या अशी साद घातली.
शिवसेना शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, पुणे उपजिल्हाध्यक्ष अनिल काशीद, शिरूर शहर प्रमुख मयूर थोरात, शिरूर शहर संघटक सुरज गाडेकर, युवा सेना शहर अध्यक्ष अमोल लुनिया, हवेली तालुकाध्यक्ष विपुल शितोळे, उपजिल्हाप्रमुख शरद नवले, यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी त्यांना शिवसेनेत येण्याचा आग्रह धरला.
त्यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी देखील लवकरच तुम्हाला खुशखबर देणार आहे असे सुचक विधान केल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. आढळराव पाटील जर शिवसेनेत परत आले तर काहीशी पोरकी झालेली शिवसेना शिरूर तालुक्यात पुन्हा बाळसे धरेल असा विश्वास शिवसैनिकांना वाटत आहे. त्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील पुन्हा शिवसेनेत येथील अशी चर्चा शिरूर तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



