नाट्यगृह आणि शिवस्मारकाबाबत मोठी घोषणा!"
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई शहराचा कारभार अधिक पारदर्शक आणि लोकाभिमुख व्हावा, या हेतूने नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या पुढाकाराने शहरात प्रथमच 'नगराध्यक्ष संवाद' कार्यक्रम काल (रविवारी) कन्याशाळेच्या सभागृहात उत्साहात पार पडला. या अभिनव उपक्रमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होऊन शहराच्या विकासाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या संवाद सत्रात नगराध्यक्षांनी वाईकरांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाट्यगृहाचे काम येत्या सहा महिन्यांत सुरू होईल, छ. शिवाजी महाराज पुतळ्याचे काम लवकरच पूर्ण करून वाईकरांची प्रतीक्षा संपवली जाईल, पर्यटन वाढवण्यासाठी महागणपती मंदिराच्या परिसरात आकर्षक लेजर लाईट शो सुरू करणार, वाईच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा 'वाई महोत्सव' येत्या २४ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, अशा अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या, ज्यामध्ये शहराच्या सांस्कृतिक आणि पायाभूत विकासावर भर देण्यात आला आहे. दरम्यान दर १०० दिवसांनी पुन्हा संवाद सत्र आयोजित होणार असून अहवाल सादरीकरण तसेच तक्रारींवर झालेल्या कामाचा अहवाल त्यावेळी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि प्रकाश व्यवस्था यांसारख्या नागरी समस्यांवर नागरिकांनी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी थेट प्रश्न मांडले. जनतेच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना अनिल सावंत म्हणाले, की "प्रशासन जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. कोणतीही तक्रार दुर्लक्षित केली जाणार नाही. शंभर दिवसांनंतर पुन्हा एकदा असाच संवाद कार्यक्रम घेऊन आजच्या प्रश्नांवर झालेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर केला जाईल."
या ऐतिहासिक संवाद सत्राला वाई शहरातील प्रतिष्ठित नागरिक, डॉक्टर, वकील, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि विविध मंडळांचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी काशिनाथ शेलार, नगरसेवक विजय ढेकणे, प्रसाद बनकर, बाळासाहेब जाधव, भुसारी, निलेश मोरे, अविनाश रांजणे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश मोरे यांनी केले तर आभार नगरसेवक विजय ढेकणे यांनी मानले.
या कार्यक्रमामुळे वाई शहरात प्रथमच लोकप्रतिनिधी आणि जनता समोरासमोर आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



