वाई पोलिसांचा 'सुपरफास्ट' तपास
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
"खाकी" वर्दीतील माणुसकी आणि कर्तव्याचा प्रत्यय पुन्हा एकदा वाईकरांना आला आहे. वाई येथील मासळी बाजारात हरवलेली ५ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर शोधून काढत मूळ मालक महिलेला सुपूर्द केली. पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
रविवार, ४ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:३० च्या सुमारास सटालेवाडी (ता. वाई) येथील रहिवासी शकुंतला तात्याबा वाडकर या वृद्ध महिला वाई येथील मच्छी मार्केट परिसरात गेल्या होत्या. तिथे त्यांची सुमारे ५ तोळे सोन्याचे दागिने असलेली पर्स अनावधानाने खाली पडली आणि गहाळ झाली. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने 'डायल् ११२' वर कॉल करून पोलिसांना याची माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य ओळखून वाई पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नितीन कदम आणि विशाल शिंदे यांनी तात्काळ तपास सुरू केला. मार्केट परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली असता, ही पर्स एका अन्य महिलेला सापडल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
वर्णनावरून पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतला आणि तिला गाठले. पोलिसांच्या चौकशीत संबंधित महिलेने आपल्याला पर्स सापडल्याची प्रांजळ कबुली दिली. पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सोन्याचे दागिने असलेली ती पर्स वृद्ध शकुंतला वाडकर यांच्या स्वाधीन केली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वाईचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी पोलीस अंमलदार नितीन कदम व विशाल शिंदे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. सातारा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



