मांढरदेव देवस्थानचा बोजवारा भाविकांच्या श्रद्धेचा बाजार आणि आरोग्याशी खेळ
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र मांढरदेव येथे श्री काळूबाईच्या यात्रेची 'जय्यत तयारी' झाल्याचा गाजावाजा प्रशासनाकडून केला जात असला, तरी प्रत्यक्ष जमिनीवरची परिस्थिती अत्यंत भयानक आणि संतापजनक आहे. एकीकडे कोट्यवधींच्या निधीच्या गप्पा मारल्या जात असताना, दुसरीकडे मात्र भक्तीच्या या पवित्र ठिकाणी कचरा, भ्रष्टाचार आणि अघोरी कृत्यांचे 'साम्राज्य' पाहायला मिळत आहे. मांढरदेव देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि वाई प्रशासनाचे या दुरवस्थेकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.
तीर्थक्षेत्राचा विकास म्हणजे काय? तर कचऱ्याचे ढीग, अघोरी कृत्यांचा सुळसुळाट आणि भाविकांची होणारी आर्थिक लूट! वाई तालुक्यातील मांढरदेव येथे श्री काळूबाईच्या यात्रेच्या नावाखाली प्रशासकीय अनास्थेचा जो 'नंगानाच' सुरू आहे, तो पाहून कोणत्याही सुज्ञ नागरिकाचे डोके संतापाने भडकल्याशिवाय राहणार नाही. देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत आणि तहसील प्रशासनाने या पवित्र तीर्थक्षेत्राचे नरकवासात रूपांतर केले आहे.
एकीकडे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या गप्पा मारतो, तर दुसरीकडे आई काळूबाईच्या चरणी येणाऱ्या भाविकांना आजही अघोरी प्रकारांना सामोरे जावे लागत आहे. मंदिर परिसरातील झाडांना काळ्या बाहुल्या, काळे बिबवे आणि जिवंत माणसांच्या फोटोंना खिळे ठोकून जे काळजाचा थरकाप उडवणारे प्रकार सुरू आहेत, ते रोखण्याचे धाडस प्रशासन का दाखवत नाही? की या अघोरी प्रथांना प्रशासनाचे छुपे समर्थन आहे? असा जळजळीत सवाल उपस्थित होत आहे.
ज्या आई काळूबाईच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात, त्याच देवीचे फोटो आज कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अस्ताव्यस्त पडलेले आहेत. कचरा संकलनात देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत सपशेल अपयशी ठरली आहे. सगळीकडे घाणीचे साम्राज्य असून, दुर्गंधीने श्वास घेणे कठीण झाले आहे. भाविकांसाठी शौचालयांची सोय नाही, त्यामुळे उघड्यावर पसरलेल्या घाणीने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. भक्तीच्या नावाखाली भाविकांना घाणीत लोळवण्याचे पाप हे प्रशासन करत आहे.
एसटी महामंडळाने यात्रेसाठी 'भंगार' बसेसचा ताफा धाडला आहे. घाटात बसेस बंद पडल्याने भाविकांचे अतोनात हाल होत आहेत. नव्या बसेस गायब कुठे झाल्या? की भाविकांच्या जिवापेक्षा महामंडळाला केवळ वसुली महत्त्वाची वाटते? नादुरुस्त बसेसमुळे एखाद्या वेळी मोठा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, याचे उत्तर महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी द्यायला हवे.
बाहेरून येणाऱ्या गरिबांना आणि छोट्या व्यावसायिकांना लुटण्याचा परवानाच जणू ग्रामपंचायत आणि देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. स्थानिक पातळीवर होणारी ही आर्थिक लूट म्हणजे भाविकांच्या खिशावर टाकलेला दरोडाच आहे.
मांढरदेव देवस्थानच्या नावाने जो कोट्यवधींचा निधी येतो, तो जातो कुठे? प्रशासनाच्या डोळ्यावर पुतळी चढली आहे का? आई काळूबाईच्या भक्तांचा अंत पाहणे आता प्रशासनाने थांबवावे, अन्यथा भविष्यात या अन्यायाविरुद्ध जनक्षोभ उसळल्याशिवाय राहणार नाही अशी, चर्चा भाविकांमध्ये जोर धरू लागली आहे.
काळूबाई चरणी जवळपास ३ लाख भाविक नतमस्तक! दोन दिवसांत १५ लाखांची देणगी आणि चांदीच्या हारांचे अर्पण
'आई काळूबाईच्या नावानं चांगभलं'च्या जयघोषात आणि गुलालाच्या उधळणीत वाई येथील श्री क्षेत्र मांढरदेवी काळूबाई देवीची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे. यात्रेचा आज तिसरा दिवस असून, सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातून लाखो भाविकांनी गडावर गर्दी केली आहे. गेल्या दोन दिवसांत ३ ते साडेतीन लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले असून, काळूबाईच्या चरणी १५ लाख रुपयांची रोख देणगी जमा झाली आहे.
यात्रेच्या निमित्ताने देवीला भाविकांकडून मौल्यवान दागिने अर्पण करण्यात आले आहेत. पुणे येथील मालन कराळे (कारेगाव) यांनी ३० हजार रुपये किमतीचा १५७ ग्रॅमचा, तर राघव शिंदे यांनी ४० हजार रुपये किमतीचा १८० ग्रॅमचा चांदीचा हार देवीला अर्पण केला आहे. संपूर्ण मंदिराला आशिष भगेरिया (पुणे) यांच्याकडून आकर्षक विद्युत रोषणाई, तर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मनमोहक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे. ५ हजार किलो लाडूंचे वाटप करण्यात येत आहे. तसेच, केवळ ३० रुपयांच्या कूपनवर भाविकांना 'पोटभर' महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी १०० कमांडो, २०० होमगार्ड आणि ८० पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे. विशेष म्हणजे, बंदोबस्तावरील जवानांच्या जेवणाची सोय देवस्थान ट्रस्टने केली आहे. गडावर ४ ते ५ रुग्णवाहिका आणि अग्निशामक दलाच्या ५ गाड्या तैनात आहेत.
प्रशासनाने यंदा कडक नियमावली लागू केली आहे. मांढरगडावर पशुहत्येला पूर्णतः बंदी घालण्यात आली असून, त्याचे सध्यातरी काटेकोर पालन होत आहे. भाविकांच्या वाहनांसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतात आणि गावाजवळ पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. यात्रेसाठी १ पोलीस उपअधीक्षक, २ पोलीस निरीक्षक, १२ पोलीस उपनिरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, २५ महिला कर्मचारी, ६० होमगार्ड, वाहतूक शाखेचे २० कर्मचारी आणि महाराष्ट्र कमांडो फोर्सचे ७० कर्मचारी मांढरदेव येथे भाविकांसाठी उपस्थित आहेत. वाई ते मांढरदेव रस्त्यावर ठिकठिकाणी पोलीस चौक्या उभारण्यात आल्या असून, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस प्रशासन अहोरात्र कष्ट घेत आहे.
भाविकांच्या लांबच लांब रांगा आणि गडावरील चैतन्यमय वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



