माघवारीत भाविकांची सोयी सुविधांना प्राधान्प देण्याची सुचना
शिवशाही वृत्तसेवा, पंढरपूर (प्रतिनिधी हुसेन मुलानी)
माघ शुद्ध एकादशी 29 जानेवारी 2026 रोजी होणार असून, यात्रा कालावधी 23 जानेवारी ते 02 फेब्रुवारी आहे. या कालावधीत पंढरपुरात तीन ते चार लाख भाविक येतात. यात्रा कालावधित भाविकांची सोयी सुविधांना प्राधान्य देऊन, वाळवंट, प्रदक्षिणा मार्ग व मंदिर परिसर तसेच शहीरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या.
माघवारी पूर्व नियोजनाबाबत प्रांत कार्यालय पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक विजयकुमार सरडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश आनेचा,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्री.ढोले यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी प्रांताधिकारी श्री इथापे म्हणाले, यात्रा कालावधीत नगरपालिकेने शुध्द व पुरेशा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, नदीपात्रातील वाळवंटाची व घाटाची स्वच्छता करावी, 65 एकर व नदीपात्रात तात्पुरते शौचालयाचे उभारणीचे नियोजन करावे. 65 एकरमध्ये भाविकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पुरेसा वीजपुरवठा आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. मंदिर समितीने यात्रा कालावधीत दर्शन रांग दर्शन मंडप या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात. दर्शन रांगेत घुसखोरी होणार नाही याची दक्षता घेऊन जादाचे सुरक्षा रक्षक नेमावेत.
आरोग्य विभागाने यात्रा कालावधीत पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा. नदी पात्रात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध राहील याबाबत पाटबंधारे विभागाने नियोजन करावे. नदीपात्रात प्रशिक्षित कर्मचाऱ्यासह यांत्रिक बोटी सज्ज ठेवाव्यात. आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावावाते. मंदिर प्रशासनाने पोलीस प्रशासनाला जादाचे सुरक्षा रक्षक उपलब्ध करून द्यावेत. अन्न औषध प्रशासनाने खाद्यपदार्थाच्या व प्रसादाच्या दुकानांची वेळोवेळी तपासणी करावी अशा सूचनाही यावेळी प्रांताधिकारी श्री इथापे यांनी दिल्या.
नगरपालिका प्रशासनाकडून वारी कालावधीत करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा, स्वच्छता, तात्पुरते शौचालय, कचरा व्यवस्थापन आदी बाबतची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. तसेच यात्रा कालावधीत वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी व भाविकांना सुरक्षेबाबत कोणतेही अडचण येऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक नियोजन केले असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सांगितले.
माघ यात्रा कालावधीत मंदिर समितीने भाविकांच्या सुलभ व जलद दर्शनाला प्राधान्य दिले असून भाविकांसाठी दर्शन मंडप, दर्शन रांग या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश आनेचा यांनी सांगितले.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



