रस्त्याचे काम तात्काळ थांबवण्याची प्रशासनाकडे मागणी
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
येत्या काही दिवसांत पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने वाई तालुक्यात राजकीय पुढाऱ्यांकडून आश्वासनांची खैरात वाटली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. यशवंतनगर जिल्हा परिषद गटातील यशवंतनगर ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या कला गार्डन ते सह्याद्रीनगर रस्त्याचे काम एका ठेकेदारामार्फत अचानकपणे सुरू करण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
सदर रस्त्याचे काम सुमारे ४० लाख रुपये खर्चून करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत असले, तरी या कामाला कोणतीही शासकीय मंजुरी नसल्याचा तसेच कोणतेही अधिकृत शासकीय इस्टिमेट तयार करण्यात न आल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतांची बेरीज करण्याच्या उद्देशाने घाईगडबडीत हे काम सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.
शासनाचा निधी खर्च होऊनही जर रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ राहिली, तर सह्याद्रीनगरमधील रहिवाशांना याचा नेमका काय फायदा होणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. प्रत्यक्षात या कामाचा फायदा स्थानिक नागरिकांपेक्षा ठेकेदार व राजकीय लाभ घेणाऱ्या पुढाऱ्यांनाच होणार असल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, रस्त्याच्या दुतर्फा असलेले लाईट पोल नियोजनपूर्वक हलवून रस्त्याची रुंदी वाढवता येऊ शकते. मात्र अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले रस्त्याचे काम अचानक एका रात्रीत सुरू करून निवडणुकीत फायदा घेण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
शासनाचा निधी खर्च होत असेल, तर हे काम नियोजनबद्ध, दर्जेदार आणि टिकाऊ स्वरूपात व्हावे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रशासनाकडे तक्रार करून सदरचे काम तत्काळ थांबविण्याची मागणी करण्यात येणार असून, गरज भासल्यास आंदोलन छेडले जाईल, अशी माहिती जितेंद्र पिसाळ यांनी दिली आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



