नवीजिजाऊ जयंतीकडे शासनाचे दुर्लक्ष
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतीक सोनपसारे)
१२ जानेवारीपर्यंत निर्णय नाही, तर राज्यव्यापी आंदोलन छेडणार – मराठा क्रांती मोर्चा
सिंदखेडराजा : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाकडे शासन व प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक भूमिका घेतली आहे. जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर आतापर्यंत पालकमंत्र्यांनी एकही आढावा बैठक न घेतल्याने तसेच कोणतेही नियोजन न केल्याने शासनाची उदासीनता स्पष्ट होत असल्याचा आरोप राज्य समन्वयक महेश भैय्या डोंगरे पाटील यांनी केला.
“जिजाऊंच्या जन्मभूमीवर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र पिण्याचे पाणी, स्वच्छता, शौचालये, पार्किंग, सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेचा पूर्ण अभाव आहे. इतिहास, श्रद्धा आणि जनभावनांचा हा अपमान सहन केला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे उत्खननात सापडलेली अकराव्या शतकातील भगवान विष्णू–लक्ष्मीची मूर्ती ही केवळ पुरातन ठेवा नसून अस्मितेचा प्रश्न असल्याचे सांगण्यात आले. जिजाऊ भक्तांच्या ठाम भूमिकेमुळेच ही मूर्ती येथेच थांबली असून, १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवाच्या दिवशी ही मूर्ती दर्शनासाठी खुली करण्यात यावी, अन्यथा मराठा क्रांती मोर्चाच ती खुली करेल, असा इशाराही देण्यात आला.
समृद्धी महामार्गावर राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब व बाल शिवबा यांचा पुतळा तात्काळ उभारण्यात यावा, अशी ठाम मागणी करण्यात आली. मातृतीर्थच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही प्रत्यक्ष विकास का दिसत नाही, याबाबत शासनाने तात्काळ श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणी मोर्चाने लावून धरली.
मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील श्रीमंत राजे लखुजीराव जाधव राजवाड्यातील CCTV यंत्रणा बंद अवस्थेत असून ती तात्काळ सुरू करण्यात यावी. नगरपालिकेमार्फत पर्यटकांकडून तिकीट वसुली सुरू असताना कोणत्याही सुविधा दिल्या जात नसल्याने ही तिकीट वसुली तात्काळ बंद करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच आडगाव राजा येथील राजे लखुजीराव जाधवराव यांच्या राजवाडा परिसरातही CCTV यंत्रणा बसवावी, अशी मागणी करण्यात आली.
तालुका व शहरातील ऐतिहासिक वास्तूंची पडझड सुरू असताना पुरातत्त्व विभाग झोपेत आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात आला. राजवाड्याची अधिकृत नोंद नसणे ही मोठी शोकांतिका असून ही शासनाची गंभीर जबाबदारी असल्याचेही मोर्चाने नमूद केले.
मोर्चाने सरकारसमोर दहा मुद्द्यांच्या ठोस मागण्या मांडल्या असून, जिजाऊंच्या जन्मभूमीसाठी स्वतंत्र राज्यस्तरीय मिशन सुरू करणे, मातृतीर्थला ऐतिहासिक पर्यटन स्थळाचा दर्जा देणे, समृद्धी महामार्गावरील पुतळ्यासाठी निधी मंजुरीची तारीख जाहीर करणे, तसेच वारसा संवर्धनासाठी मागील दहा वर्षांत आलेल्या निधीचा हिशोब सार्वजनिक करणे, या प्रमुख मागण्यांचा त्यात समावेश आहे.
यावेळी पालकमंत्र्यांनी जिजाऊ जन्मोत्सवाबाबत एकही बैठक न घेतल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. १२ जानेवारी २०२७ पर्यंत समृद्धी महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रमाता जिजाऊ यांचे पुतळे उभारण्यात आले नाहीत, तर MSRDC चे अधिकारी अनिल गायकवाड यांना काळे फासण्याचा इशारा देण्यात आला, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.
तसेच सिंदखेडराजा येथे पंढरपूर धर्तीवर शासकीय पूजा सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला.
यावेळी मराठा क्रांती मोर्चा व छावा संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव, निलेश देवरे, अतिश राजेश जाधव, गोविंद टेके, शिवा पुरंदरे, बाळासाहेब शेळके, दीपक किंगरे, संजय उगले, बाळासाहेब पाथरकर, निलेश देशमुख, बाबासाहेब पुरंदरे, दिगंबर शिंदे, देव्हडे पाटील, विठ्ठल चव्हाण, उत्तम राजे जाधव यांच्यासह मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



