यशवंतनगर गट गण कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
मौजे व्याहाळी कॉलनी येथे यशवंतनगर गट व गण कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा आमदार ना. मकरंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले. यावेळी यशवंतनगर, पसरणी व संबंधित तिन्ही गणांच्या जागा प्रचंड मताधिक्याने जिंकण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.
“मताधिक्य वाढत गेले, हा कार्यकर्त्याचा अभिमान” आपल्या भाषणात ना. पाटील म्हणाले, “माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही विधानसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य वाढत गेले, हा माझ्यासाठी अभिमानाचा विषय आहे.” गेल्या चार वर्षांतील विकासकामांचा आढावा घेत त्यांनी जलसंधारण, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व रोजगार निर्मिती या विषयांवर सविस्तर माहिती दिली.
पाणी प्रश्नावर ठाम भूमिका
बलकवडी धरणाच्या माध्यमातून या भागात पाणी पोहोचवण्यात यश आले असून, जांभळी–अभेपुरी भागासाठीही पाणीपुरवठ्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागेवाडी धरणाचे रखडलेले कॅनॉल पूर्ण करून वाड्या-वस्त्यांपर्यंत पाणी पोहोचवले, तर जललक्ष्मी योजनेतून ४८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून पसरणी ते सिद्धनाथवाडीपर्यंत पाणी नेण्यात यश आले, असे त्यांनी सांगितले. देवघर धरणावर २६५ कोटी रुपयांच्या तीन उपसा सिंचन योजना राबवण्यात येत असून, यामुळे खंडाळा तालुक्यातील सुमारे २७ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
वाई नगरपालिका निकाल – वास्तव स्वीकारून आत्मविश्वास वाई नगरपालिका निवडणुकीबाबत स्पष्ट भूमिका मांडताना ना. पाटील म्हणाले, “अपेक्षित यश मिळाले नाही, हे वास्तव आहे. पण त्यामुळे खचण्याचे कारण नाही.” विधानसभेच्या प्रत्येक निवडणुकीत वाईकरांनी भरभरून मताधिक्य दिल्याची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, मागील निवडणूक – सुमारे १०,५०० मताधिक्य त्याआधी – ५,५०० त्याआधी – ५,०००वाई नगरपालिकेत आजपर्यंत थेट नगराध्यक्ष निवडून न आल्याचे वास्तव स्वीकारत त्यांनी पाचगणी व महाबळेश्वर नगरपालिकांमध्ये मिळालेल्या घवघवीत यशाचा दाखला दिला. पाचगणीत १५ वर्षांनंतर नगराध्यक्ष व २० पैकी १६ नगरसेवक, तर महाबळेश्वरमध्ये नगराध्यक्षासह बहुमत मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कारखाने, कर्जमुक्ती आणि शेतकऱ्यांना दिलासा १००० कोटी रुपयांच्या कर्जात अडकलेले दोन्ही साखर कारखाने ताब्यात घेऊन ते पूर्ण क्षमतेपेक्षा जास्त चालवले जात असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व बँकांचे One Time Settlement पूर्ण झाले असून, आजच Bank of India ची अंतिम सेटलमेंट झाली असल्याची माहिती त्यांनी दिली. ऊस दर ₹३३५० जाहीर असून, पहिल्या पंधरवड्याचे पैसे दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
खडी क्रशर प्रकरणावर स्पष्ट खुलासा
एकसर पार्टीवाडी–कुसगाव खडी क्रशर प्रकरणात माझ्यावर जाणीवपूर्वक चिखलफेक करण्यात आल्याचा आरोप करत ना. मकरंद पाटील म्हणाले, “या प्रकरणाशी माझा कसलाही संबंध नाही, हे ग्रामस्थांना माहिती आहे. तरीही विरोधकांनी राजकीय आग पेटवण्याचा प्रयत्न केला. कोणी पेट्रोल ओतले तर कोणी रॉकेल ओतले ”
रस्ते, पर्यटन व रोजगार महाबळेश्वर, भोर–मांढरदेव–वाई रस्त्यांची कामे सुरू असून, वाडकरवाडी–पांगरी हा सुमारे २०० कोटींचा नवीन रस्ता येत्या अर्थसंकल्पात मंजूर केला जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी ५०० ते ६०० कोटींच्या थीम पार्क, जंगल सफारी व पर्यावरणपूरक प्रकल्पांवर चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
आरोग्य, वीज आणि कोविड काळातील कार्य
मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले असून, वेलंग येथील पीएससीसाठी जागा न मिळाल्याने काम रखडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “जागा न दिल्यास इतर गावात रुग्णालय नेण्याचा विचार करावा लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला. वारंवार जाणाऱ्या वीजपुरवठ्यासाठी नवीन सबस्टेशन मंजूर केल्याची माहितीही त्यांनी दिली परंतु जागे अभावी ते सब स्टेशन उभारण्यात येत नसून त्याकरता जागा पाहणे चालू आहे.
कोविड काळात मी ऍडमिट असताना सुद्धा फोनवरून लोकांना बेड व्हेंटिलेटर अवेलेबल करून अनेक लोकांचे प्राण वाचवले आहेत कोविड सेंटर उभारले होते व अतिवृष्टी काळात २५ हजार मदत किट, कोविड सेंटर, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर व तातडीची मदत देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उमेदवार कोण असावा, निर्णय तुमचा“उमेदवार कोण असावा, हा निर्णय स्थानिक प्रमुखांनी घ्यावा. पण काहीही झाले तरी तिन्ही जागा प्रचंड मताधिक्याने जिंकायच्याच,” असे ठाम आवाहन त्यांनी केले.
तर या मेळाव्यास नाना जाधव संदीप मानकुंबरे अण्णा पाटील वाशिवले बजरंग कोंढाळकर पंकज वाडकर रोहित वाडकर राजेश शिंदे दिलीप वाडकर प्रतापराव पवार शशिकांत पवार महादेव मस्कर सत्यजित वीर विजयसिंह नायकवडी आनंद चिरगुटे बजरंग कोंढाळकर धनंजय महांगडे मयूर चव्हाण पाटील लक्ष्मण वाशिवले धर्माजी शिर्के मारुती वाडकर अमित देसाई ब्रह्मदेव वाडकर किसन वाडकर
मेळाव्यात विजय येवले (सातारा जिल्हा शिक्षक कृती समिती अध्यक्ष), बायजाबाई वाघमारे (धोम), विनायक वाडकर (माजी सरपंच, कुसगाव), भिवाजी शिंदे (बोरगाव), ज्ञानेश्वर मांढरे (अभेपुरी), मेघा सावंत (सरपंच, यशवंतनगर), गेणुबा चौधरी (खावली), कृष्णदेव वाडकर (माजी सरपंच, धावली), दिलीप वाडकर (वयगाव), विक्रांत डोंगरे माजी उपसभापती पंचायत समिती व विजय सिंह नायकवडी माजी सभापती, पंचायत समिती यांनी मनोगत व्यक्त करत “विरोधकांकडे उमेदवारच नाहीत,” अशी टीका केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पुजारी यांनी केले, तर माजी पंचायत समिती सदस्या सुनीता कांबळे यांनी आभार मानले
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



