नगराध्यक्षांच्या 'कास्टिंग व्होट'ने घनश्याम चक्के उपनगराध्यक्ष
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई नगरपालिकेत आज झालेल्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कमालीची चुरस पाहायला मिळाली. सत्ताधारी आणि विरोधी गटात मतांचे पारडे समसमान पडल्यानंतर, नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आपल्या 'कास्टिंग व्होट' (निर्णायक मत) अधिकाराचा वापर केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) घनश्याम चक्के यांची भाजपाच्या मतावर उपनगराध्यक्ष पदी निवड झाली. तर, स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपचे सचिन सावंत आणि राष्ट्रवादीचे शब्बीर पठाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली तर मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्या उपस्थितीत ही विशेष सभा पार पडली. यावेळी भाजपचे १०, राष्ट्रवादीचे १२ आणि एक अपक्ष उमेदवार उपस्थित होते. उपनगराध्यक्ष पदासाठी विजय ढेकाणे (भाजप), घनश्याम चक्के (राष्ट्रवादी) आणि सुशील खरात (अपक्ष) यांनी अर्ज दाखल केले होते. यामध्ये भाजपच्या विजय ढेकाणे यांनी अर्ज माघार घेतल्याने लढत चक्के आणि खरात यांच्यात झाली. सभागृहात हात उंचावून झालेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी १२ मते पडल्याने पेच निर्माण झाला. अखेर नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी आपले निर्णायक मत राष्ट्रवादीच्या घनश्याम चक्के यांच्या पारड्यात टाकले आणि चक्के यांचा विजय निश्चित झाला. मात्र, राष्ट्रवादीच्या घनश्याम चक्की यांना राष्ट्रवादीकडून एकही मतदान झाले नाही तसेच त्यांना सूचक व अनुमोदक हे भाजपचे सदस्य होते यावरून उपनगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादीच्या पारड्यात कसे या संभ्रमात वाईकर नागरिक अडकले आहेत.
दरम्यान, उपनगराध्यक्ष निवडीसोबतच स्वीकृत नगरसेवक पदासाठीही प्रक्रिया राबवण्यात आली. सर्वानुमते सचिन जगन्नाथ सावंत (भाजप), शब्बीर दिलावर पठाण(राष्ट्रवादी) या दोन नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. तसेच, नगरपालिकेच्या विविध विषयांकित समित्यांची सदस्य संख्या ६ ठेवण्याचा निर्णयही या सभेत सर्वानुमते घेण्यात आला.
अनिल सावंत यांनी नियोजनबद्ध पद्धतीने राष्ट्रवादी च्या नगरसेवकाला आपल्या जाळ्यात ओढून उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पाडली. उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के हे जरी मी राष्ट्रवादीचा आहे असे म्हणत असले तरीही राष्ट्रवादीने एकही मत त्यांना दिले नाही. तर ही भूमिका पडद्यामागून भाजपा तालुका अध्यक्ष दीपक ननावरे यांनी पार पाडल्याचे बोलले जात आहे. यावरून राष्ट्रवादी पक्ष पुन्हा एकदा वाई नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सपशेल फेल झाला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई पोलिसांनी पालिकेच्या परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. प्रशासकीय कामकाजासाठी कार्यालयीन अधीक्षक नारायण गोसावी, मोहिते, बागुल आणि इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला.
सभागृहातील समन्वय साधण्यासाठी ही केली तडजोड
आज शुक्रवार दि. ०९ रोजी नगरपालिका छत्रपती शिवाजी महाराज सभागृहामध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवड करण्यात आली यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक १२ असतानाही भाजपच्या मदतीने राष्ट्रवादी चा उपनराध्यक्ष करण्यात आला. ही सर्व तडजोड सभागृहातील समन्वय राखण्यासाठी करण्यात आलेली आहे. सभागृहात येताना पक्षाचे जोडे बाहेर ठेवून वाई शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
: नगराध्यक्ष अनिल सावंत
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



