पोलीसात तक्रार दाखल
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील परखंदी येथे जमिनीच्या जुन्या वादातून एका व्यक्तीवर लोखंडी खोऱ्याने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुभाष सिताराम देशमुख (वय ५५) यांनी वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २:०० च्या सुमारास ही घटना घडली. तक्रारदार सुभाष देशमुख हे त्यांच्या नवीन घराच्या स्लॅबच्या पूजेसाठी परखंदी येथील गट नं. १७८ च्या शिवारात गेले होते. पूजा सुरू असताना, त्यांचा पुतण्या जितेंद्र संपत देशमुख (वय ५३) तिथे आला. "तू सुभाषला पूजेला का बोलावले?" असे म्हणत त्याने रागाच्या भरात जवळच पडलेले लोखंडी खोरे उचलले आणि सुभाष यांच्या डोक्यावर पाठीमागून वार केला.
या हल्ल्यात सुभाष देशमुख यांच्या डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली. यावेळी उपस्थित असलेल्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी मध्यस्थी करून जितेंद्रला बाजूला केले. जखमी सुभाष यांना तातडीने वाई येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र जखम गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
उपचार पूर्ण झाल्यानंतर, सुभाष देशमुख यांनी वाई पोलीस ठाण्यात हजर राहून आपली जबानी नोंदवली आहे. पोलिसांनी जितेंद्र संपत देशमुख याच्याविरुद्ध मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वाई पोलीस करत आहेत.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



