पालिका प्रशासन ढिम्म; अतिक्रमणांच्या विळख्यात वाईकरांचा श्वास कोंडला
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
तीर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहराचे नगरपालिकेच्या गलथान, सुस्त आणि निष्क्रिय कारभारामुळे अक्षरशः विद्रुपीकरण झाले आहे. शहरातील वाहतूक, अतिक्रमण आणि बेकायदा बांधकामांचा प्रश्न गंभीर असताना, पालिका प्रशासन मात्र आठ वर्षांपासून डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहे.
वाई नगरपरिषदेने १९ एप्रिल २०१७ रोजी ठराव क्रमांक ३ अन्वये “वाहतूक विकास आराखडा” मंजूर केला होता. या आराखड्यात पार्किंग व्यवस्था, वन-वे वाहतूक, तसेच जड वाहनांवर निर्बंध याबाबत स्पष्ट तरतुदी करण्यात आल्या होत्या. मात्र, तब्बल ८ वर्षे उलटूनही हा आराखडा आजही धूळखात पडलेला आहे. पोलीस प्रशासनाने वेळोवेळी पत्रव्यवहार करून सूचना दिल्या, इशारे दिले; मात्र पालिका प्रशासनाने या पत्रांना अक्षरशः केराची टोपली दाखवली. परिणामी शहरात आज अराजक माजले आहे. अतिक्रमणांचे साम्राज्य, पालिकेची बघ्याची भूमिका शहरात विनापरवाना व्यावसायिक, रस्त्यावर बसलेले फेरीवाले, बेकायदा बांधकामे यांचे पेव फुटले आहे. पादचाऱ्यांना चालण्यासाठी रस्ता उरलेला नाही.
कारवाई करणे तर दूरच, पण साधा जाब विचारण्याचे धाडसही पालिका अधिकारी दाखवत नाहीत. “अधिकारी नेमके कशासाठी येतात? खुर्च्या उबवायला की ‘माया’ गोळा करायला?” असा संतप्त सवाल आता नागरिक उघडपणे विचारू लागले आहेत. या बेकायदा प्रकारांना कोणाचा वरदहस्त आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. वाहतूक कोंडीने नागरिक हैराण शहरातील मुख्य चौक, बाजारपेठ आणि अरुंद रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने उभी केलेली वाहने, वन-वे नियमांचा अभाव आणि जड वाहनांची बिनदिक्कत घुसखोरी यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. रुग्णवाहिका, अग्निशमन वाहनांनाही वाट काढणे अवघड झाले आहे.
स्थानिक वृत्तपत्रे आणि सामाजिक माध्यमांतून वारंवार आवाज उठवला जात असतानाही पालिका प्रशासनाने ‘तोंडात मिठाची गुळणी’ धरल्यासारखी भूमिका घेतली आहे. एसी केबिनमधील कारभार, रस्त्यावर नागरिकांचे हाल वन-वे वाहतुकीचा पत्ता नाही, पार्किंगच्या नावाखाली गोंधळ आहे, जड वाहने शहरात मोकाट फिरत आहेत; आणि दुसरीकडे पालिकेचे अधिकारी मात्र एसी केबिनमध्ये बसून फक्त कागदं हलवण्यात व्यस्त आहेत. नागरिकांच्या त्रासाशी त्यांना काहीही देणेघेणे राहिलेले नाही. २०१७ मध्ये मंजूर झालेला वाहतूक आराखडा अजूनही अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. पालिका अधिकारी कारवाई करायला घाबरतात की मुद्दाम डोळेझाक करतात? खिसे गरम झाल्यामुळेच ही मूक संमती आहे का? असे सवाल आता उघडपणे उपस्थित होत आहेत.
जर तात्काळ ठोस निर्णय आणि कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांना वाईकर जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असे म्हणणे अजिबात वावगे ठरणार नाही.
नगराध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पुढच्या 100 दिवसात हे प्रश्न सुटलेले दिसतील त्यावर पोलीस प्रशासना बरोबर बोलणे झाले आहे c c tv चा विषय काल मार्गी लावला आहे वाईकर नागरिक व्यापारी आणि रिक्षा चालक टेम्पो चालक टपरीवाले याना विश्वासात घेऊन हा प्रश्न मार्गी लावणार.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



