ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषणाचा इशारा
शिवशाही वृत्तसेवा, बुलढाणा (प्रतिनिधी प्रतिक सोनपसारे)
सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक मुतारीकडे व खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनकडे जाणाऱ्या सुमारे २० फूट रुंद सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या अतिक्रमणामुळे परिसरातील रहदारी ठप्प झाली असून, महिलांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. तात्काळ अतिक्रमण हटवण्यात यावे, अन्यथा ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते शेख हानिफ बागवान यांनी दिला आहे.
या संदर्भात शेख हानिफ बागवान यांनी तहसीलदार व गट विकास अधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद केले आहे की, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक मुतारीसह खरेदी-विक्री संघाच्या गोडाऊनकडे जाण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता. पूर्वी खत व बियाण्यांचे ट्रक या रस्त्याने गोडाऊनमध्ये ये-जा करीत असत. मात्र गोडाऊन बंद पडल्याचे कारण पुढे करून संबंधित जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे.
अतिक्रमणामुळे गोडाऊनकडे जाणारा रस्ताच नाहीसा झाला असून, त्याच परिसरातील सार्वजनिक मुतारीदेखील वापरात नसल्याने बंद अवस्थेत आहे. परिणामी महिलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणी तक्रारदारांनी ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात माहिती दिली. तथापि, ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अतिक्रमणधारकांचे मनोबल वाढत असून सार्वजनिक रस्त्यांचा वापर अडथळाग्रस्त होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर अतिक्रमण हटवण्यात यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा ठाम इशाराही शेख हानिफ बागवान यांनी दिला आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



