स्थानिक तरुणांनी शोधला प्राचीन वारसा
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
वाई प्रांताचा ऐतिहासिक पहारेकरी म्हणून ओळखला जाणारा किल्ले वैराटगड हा आजवर मुख्यतः मध्ययुगीन दुर्ग म्हणूनच अभ्यासला जात होता. मात्र अलीकडे वाई येथील इतिहास अभ्यासक सौरभ जाधव यांनी केलेल्या संशोधनामुळे वैराटगडाच्या परिसरात प्राचीन बौद्ध परंपरेचा अत्यंत महत्त्वपूर्ण पुरावा उजेडात आला असून, त्यामुळे वाई परिसराचा इतिहास थेट इसवी सनाच्या प्रारंभीच्या काळापर्यंत मागे जातो, हे स्पष्ट झाले आहे.
वैराटगडाच्या पश्चिम बाजूस असलेल्या जांभुळणे गावाच्या डोंगरात असलेली ही अपरिचित लेणी सौरभ जाधव यांच्यासह रोहित मुंगसे, आशुतोष शिंदे आणि शंभूराज पिसाळ या चार मित्रांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणीदरम्यान नोंदवली. दुर्गम व जंगलमय भागात असलेली ही लेणी आजवर दुर्लक्षित राहिली होती. स्थानिक भूभागाची पाहणी, मोजमाप आणि तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर या लेण्यांचे ऐतिहासिक महत्त्व स्पष्ट झाले. ही लेणी स्थापत्यदृष्ट्या अत्यंत साधी, अलंकरणविरहित आणि पूर्णतः उपयोगप्रधान स्वरूपाची आहे. कातळात कोरलेली ही लेणी खोलीच्या स्वरूपाची असून तिच्या दर्शनी भागावर आयताकृती दरवाजा कोरलेला आहे. दरवाजाच्या चौकटीवर दिसणाऱ्या खाचा पाहता येथे पूर्वी लाकडी चौकट व दरवाजा दाब-जोडणी पद्धतीने बसवण्यात आला असावा, असे जाणवते. जंगलातील हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षण मिळावे या उद्देशाने अशी रचना करण्यात आली असावी, असे अभ्यासकांचे मत आहे.
लेणीच्या उजव्या बाजूस प्रकाश व वायुवीजनासाठी कोरलेली लहान खिडकी आणि आतील बाजूस कातळातच तयार केलेला ओटा ही रचना बौद्ध थेरवाद हीनयान पंथातील भिख्खू निवासस्थानांशी सुसंगत आहे. कोणतेही शिल्पांकन किंवा अलंकरण नसणे, मर्यादित अंतर्गत जागा आणि ध्यान व निवासाला पूरक रचना यांवरून ही लेणी बौद्ध भिख्खूंनी वर्षावासाच्या काळात ध्यानधारणा व निवासासाठी वापरली असावी, असे स्पष्ट होते.
वाई परिसर हा कृष्णा नदीच्या खोऱ्यात वसलेला असून कोकण आणि देश यांना जोडणाऱ्या प्राचीन घाटवाटा व व्यापारी मार्गांवर स्थित आहे. त्यामुळे हा भाग प्राचीन काळापासून सांस्कृतिक देवाणघेवाणीचे केंद्र राहिला आहे. पालपेश्वर, पांडवगड, सोनजाई आणि कडजुबाई येथील लेण्यांप्रमाणेच ही नव्याने समोर आलेली लेणी वाई परिसरातील बौद्ध वसाहतींची साखळी अधिक ठोस करते. या सर्व लेण्यांच्या स्थापत्य रचनेतील साम्य लक्षात घेता, वाई परिसरात सातवाहन काळात बौद्ध भिख्खूंचे संघटित अस्तित्व होते, हे अधोरेखित होते.
या संशोधनातून वैराटगडाच्या नावाची व्युत्पत्ती आणि वैराष्ट्रिक लोकांचा इतिहास यांचाही परस्परसंबंध स्पष्ट करण्यात आला आहे. बौद्धक्रांतिकाळात उत्तर भारतातून दक्षिणेकडे स्थलांतर करणाऱ्या वैराष्ट्रिक लोकांनी वायदेश परिसरात वसाहती निर्माण केल्या असाव्यात. ‘वैराटगड’ हे नाव ‘वैराष्ट्रिक गड’ या संज्ञेचा अपभ्रंश असण्याची शक्यता या अभ्यासातून अधिक बळकट होते. पुढील काळात वैराष्ट्रिक, राष्ट्रिक आणि महाराष्ट्रीक या लोकसमूहांच्या एकत्रीकरणातून ‘माहाराष्ट्रिक’ आणि पुढे ‘त्रिमहाराष्ट्रक’ ही ऐतिहासिक संकल्पना उदयास आली.
आजवर वैराटगडाचा अभ्यास मध्ययुगीन लष्करी इतिहासापुरताच मर्यादित राहिला होता. मात्र जांभुळणे गावाच्या डोंगरात आढळलेली ही लेणी वैराटगड परिसराचा इतिहास थेट प्राचीन बौद्ध काळाशी जोडते. त्यामुळे हा परिसर केवळ दुर्गांचा नव्हे, तर प्राचीन धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचा महत्त्वपूर्ण केंद्रबिंदू असल्याचे स्पष्ट होते.
या नव्या शोधामुळे वाई परिसरातील अपरिचित पुरातत्त्वीय स्थळांचे शास्त्रीय सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण आणि संवर्धन करणे अत्यावश्यक बनले आहे. भविष्यातील संशोधनातून वाई प्रांताच्या इतिहासाचे अनेक नवे संदर्भ उजेडात येण्याची शक्यता असून, या शोधामुळे महाराष्ट्राच्या प्राचीन सांस्कृतिक इतिहासात मोलाची भर पडणार आहे.
-----------------------
---------------------
----------------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा




