रिक्षाचालकांच्या अमानवी भूमिकेवर तीव्र संताप
शिवशाही वृत्तसेवा, वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई शहरातील किसनवीर चौक येथे आज सकाळी ब्रेक फेल झाल्याने एक रोड रोलर थेट जठार यांच्या पानाच्या दुकानात घुसल्याची थरारक घटना घडली. ही घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची असली तरी “वेळ आली होती, पण काळ आला नव्हता”, अशीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली.
सकाळची वेळ असल्याने शाळा सुरू होत्या, त्यामुळे विद्यार्थ्यांची रहदारी तुलनेने कमी होती. तसेच बहुतांश दुकाने सकाळी साडेदहा वाजेपर्यंत बंद असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. या अपघातामध्ये एक दुचाकी, सिद्धिविनायक वडापाव सेंटरची भिंत तसेच जठार यांच्या पानाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. थोडक्यात मोठा अनर्थ टळल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. रोड रोलरच्या चालकाने प्रसंगावधान राखून सतर्कता बाळगल्याने तसेच आजूबाजूच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आरडाओरडा केल्यामुळे हा भीषण अपघात टळला.
सुदैवाने या घटनेत कोणीही गंभीर जखमी किंवा दगावले नाही, ही बाब दिलासादायक ठरली आहे मात्र या घटनेनंतर समोर आलेली एक अत्यंत निंदनीय आणि क्लेशदायक बाब सर्वांनाच हादरवून सोडणारी आहे. अपघातात जखमी झालेल्या रोड रोलर चालकाला तातडीने दवाखान्यात नेण्याची गरज असताना एकाही रिक्षाचालकाने मदतीसाठी पुढे येण्याचे धाडस दाखवले नाही. जखमी चालक रस्त्यावर असतानाही रिक्षा न मिळणे ही बाब अत्यंत अमानवी असून समाजाच्या माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.
“एखाद्याचा प्राण वाचावा म्हणून केले जाणारे प्रयत्न हे अशा मुजोर रिक्षाचालकांमुळे निष्फळ ठरत आहेत,” अशी तीव्र भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. आज तो चालक होता, उद्या हीच वेळ कुणावरही येऊ शकते, याचे भान ठेवण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती. पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी हजर होत गर्दी पांगवली आणि वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून दिला. ट्रॅफिक पोलीस हवालदार कोळेकर, डी.बी. पथकातील श्रवण राठोड आणि राम कोळी हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
वाईसारख्या शहरात जखमी व्यक्तीला दवाखान्यात नेण्यासाठी वाहन न मिळणे ही अत्यंत गंभीर बाब असून, अशा असंवेदनशील रिक्षाचालकांवर प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे. ही घटना केवळ अपघात नसून समाजातील माणुसकीची कसोटी पाहणारी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी नागरिकांची जाणीव आणि प्रशासनाची ठोस भूमिका आवश्यक आहे, हेच या घटनेतून स्पष्ट होते.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



