अनधिकृत जमीन संपादनाविरोधात धोम धरण संघर्ष समिती आक्रमक
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
धोम (ता. वाई) येथील गट क्रमांक १५३ मध्ये वाई नगरपालिकेने सुरू केलेल्या पाणीपुरवठा स्कीमसाठी केलेली जमीन संपादन प्रक्रिया अनधिकृत असल्याचा गंभीर आरोप करत धोम धरण संघर्ष समिती -पश्चिम भाग आणि धरणग्रस्त नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या अन्यायाविरोधात, समितीने शुक्रवार दि. १२ डिसेंबर २०२५ रोजी धोम येथे नगरपालिकेच्या कामाच्या ठिकाणी एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
धोम धरण संघर्ष समितीने उपविभागीय अधिकारी (वाई) यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाई नगरपालिकेने धोम (ता. वाई, जि. सातारा) येथील गट नंबर १५३ मध्ये पाणीपुरवठा स्कीम (टाकी आणि पाईपलाईन) सुरू केली आहे. या कामासाठी धोम ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी किंवा माहिती घेतलेली नाही. ग्रामपंचायतीच्या अधिकारांचे उल्लंघन करून हे काम सुरू असल्याचा समितीचा दावा आहे.
समितीने निवेदनात, जमीन वाटपातील अनियमिततेवरही प्रश्न उपस्थित केला आहे. धोम गावात पाण्याची टाकी बांधण्यासाठी जलसंपदा विभागाने १ गुंठा जमीन मागितली असता ती नाकारण्यात आली होती. मात्र, वाई नगरपालिकेला १ हेक्टर (सुमारे २.५ एकर) जमीन कोणत्या आधारावर देण्यात आली, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
धोम धरणाच्या पश्चिम भागातील २५ टक्के धरणग्रस्तांचे पुनर्वसन अजूनही बाकी आहे. वारंवार याबाबतीत मागणी व तक्रारी करूनही कोणतीही ठोस उपाययोजना अथवा यातून मार्ग काढताना संबंधित विभाग दिसून येत नाही. गेली ५० वर्षे ४०० ते ५०० कुटुंबे याच जमिनीवर उदरनिर्वाह करत आहेत व त्यांची घरेही येथेच आहेत.
जलसंपदा विभाग गेल्या काही वर्षांपासून या जमिनीवर हक्क दाखवत असताना, मूळ मालक शेतकरीच या जमिनीची वहिवाट करत आहेत.
समितीची मागणी आहे की, पुनर्वसन बाकी असताना आणि ग्रामपंचायतीची परवानगी नसताना केलेले हे जमीन संपादन रद्द करावे आणि ही वहिवाट केलेली जमीन तातडीने मूळ शेतकरी मालकांना परत मिळावी.
जर प्रशासनाने या मागणीची दखल घेतली नाही, तर दि. १२ रोजी नगरपालिकेचे काम चालू असलेल्या ठिकाणी ४०० ते ५०० कुटुंबांच्या उपस्थितीत शांततापूर्ण ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा धोम धरण संघर्ष समितीने दिला आहे.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा














