वाढेफाटा ते लिंबखिंड मार्गावर अपघाताचे प्रमाण सर्वाधिक
शिवशाही वृत्तसेवा,सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे )
व्यवसायिकांचा मुजोरपणा. प्रवासी व नागरिक चिंतेत. यंत्रणेचे दुर्लक्ष.
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील घडणारे रस्ते अपघाताचे प्रमाण सर्वाधिक असताना याकडे संबंधित यंत्रणेचे होत असलेले दुर्लक्ष चिंताजनक आहे.महामार्गावरील सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची असताना याकडे गांभीर्याने सर्वच घटकांनी पाहणे गरजेचे आहे.पुणे बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची ये-जा सुरू असल्याने विशेष दक्षता घेणे आवश्यक असताना सातारा शहरातीलगतच्या वाढेफाटा ते लिंबखिंड मार्गावरील काही व्यवसायिकांनी महामार्ग सुरक्षिततेसाठी बनवलेल्या दुभाजकाची तोडफोड केली आहे.या घटनेकडे रस्ते विकास प्राधिकरण महामंडळाचे दुर्लक्ष झाल्याचेही जाणवते.या मार्गावरील व्यवसायिकांचा मुजोरपणा वाढला असून वाढेफाटा ते लिंबखिंड हा परिसर अपघाताचे केंद्र बनला आहे.या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे.दिवस-रात्र या मार्गावर वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात असल्याने येथे अपघाताचे प्रमाणही सर्वाधिक आहे.वास्तविक महामार्गावर अपघात घडू नये यासाठी दरवर्षी रस्ते विकास प्राधिकरण महामंडळ रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन मोठ्या प्रमाणात करीत असते.
ठिकठिकाणी याबाबत मेळावे,परिसंवाद व पथनाट्य तसेच वाहनांची तपासणी, वाहन चालकांनी घ्यावयाची सुरक्षा बरोबरच मोठ्या प्रमाणात जनजागृती व प्रबोधन या काळात संबंधित विभागाकडून केले जाते.परंतु हा सप्ताह संपल्यानंतर येरे माझ्या मागल्या या उक्तीप्रमाणे संबंधित यंत्रणेला याचा विसर पडतो की काय अशी शंका आता येऊ लागली आहे. खरे तर राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित विभागाने याकडे डोळसपणे पाहणे गरजेचे आहे.
महामार्गावरील रस्ते अपघाताचे वाढते प्रमाण हे सुरक्षिततेच्या उपाययोजना वेळेत न केल्यामुळेच घडल्याचे दिसून येते.प्रवाशांच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्यक्रम देणे ही रस्ते विकास महामंडळाची जबाबदारी आहे.सुरक्षिततेसाठी रस्त्याकडेला असलेले दुभाजकांची मोठ्या प्रमाणात होणारी तोडफोड व त्याकडील होणारे दुर्लक्ष हे निंदणीय आहे. व्यवसायिकांच्या स्वार्थी भूमिकेचा नाहक त्रास मात्र अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना होत असतो. वास्तविक शासकीय कामाची तोडफोड करणे ही गंभीर बाब असून तोडणाऱ्यांवर तातडीने गुन्हे नोंद होणे आवश्यक आहे.
श्रीरंग काटेकर सातारा.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा![]()














