वाईकरांनी घडवला नवा इतिहास - अटीतटीच्या लढतीत भाजपाच्या जयाभाऊंचे 'व्हिजन' विजयी
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
सातारा जिल्ह्यातील वाई नगरपरिषदेच्या अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने 'गड' जिंकला आहे. भाजपाचे विकासाचे व्हिजन आणि मतदारांचा विश्वास यांच्या जोरावर नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विजयी सभेत राज्याचे नेते आणि संकटमोचक जयकुमार गोरे यांनी वाईकरांचे आभार मानत विकासाची मोठी ग्वाही दिली.
निवडणुकीपूर्वी "नगरपरिषद भाजपाच्या ताब्यात द्या, मी स्वतः विजयी सभेला येईन," असा शब्द जयकुमार गोरे यांनी वाईकरांना दिला होता. आपला शब्द पाळत गोरे यांनी काल विजयी सभेला उपस्थिती लावली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, "आजचा दिवस वाई शहराच्या आणि कृष्णामाईच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे. मतदारांनी आमच्या विकासाच्या वचनावर विश्वास ठेवून नवा इतिहास लिहिला आहे."
यावेळी जयकुमार गोरे यांनी वाई शहराच्या विकासासाठी तीन महत्त्वाच्या कामांचे आश्वासन दिले. संथ वाहणाऱ्या कृष्णामाईची मनापासून सेवा करणे, शहरात अद्ययावत क्रीडांगण उभारणे आणि वाई नगरपरिषदेला ‘ब’ वर्गाचा दर्जा मिळवून देणे.
"पुढच्या वेळी जेव्हा मी मतांची मागणी करायला येईन, तेव्हा ही सर्व कामे पूर्ण झालेली असतील," असा ठाम विश्वास व्यक्त करत आबा... अनिल नगराध्यक्ष झाला बरं का! असे नाव न घेता मंत्री मकरंद पाटील यांना टोला लगावला.
या विजयोत्सव सभेला जिल्हयातील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यात ज्येष्ठ नेते माजी आ. मदन भोसले, सातारा जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष सुरभी भोसले, नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत, तालुकाध्यक्ष दीपक ननावरे, शशिकांत पिसाळ, नंदकुमार खामकर, विजय ढेकाणे यांचा समावेश होता.
तसेच नवनिर्वाचित नगरसेविका केतकी विजय पाटणे, पद्मा पाडळे, प्रसाद बनकर व इतर सर्व विजयी उमेदवारांचे गोरे यांनी अभिनंदन केले. या सोहळ्याला भाजप कार्यकर्ते आणि वाई शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------
------------------------
-----------------------
------------------------
------------------------
-----------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा










