वाई पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
वाई शहर व परिसरातून तसेच महाराष्ट्र व इतर राज्यांतून चोरीस गेलेले व गहाळ झालेले एकूण ३० मोबाईल (किंमत सुमारे ६ लाख रुपये) वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शोधून काढून तक्रारदारांना परत केले. हे मोबाईल वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या हस्ते तक्रारदारांना सुपूर्द करण्यात आले.
वाई शहर ही सातारा जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठ असून आजूबाजूच्या गावांतून मोठ्या प्रमाणात नागरिक नोकरी, शिक्षण व खरेदीसाठी येत असतात. या गर्दीमुळे प्रवासात व बाजारपेठेत मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम व उपविभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांच्या आदेशानुसार गहाळ मोबाईल तक्रारी गांभीर्याने घेऊन तात्काळ शोधमोहीम राबविण्यात आली.
पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक सुधीर वाळुंज व पोलीस कॉन्स्टेबल विशाल शिंदे यांना योग्य मार्गदर्शन करून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह इतर राज्यांतूनही मोबाईल शोधून काढण्यात यश आले.
माहे जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकूण ३३० नामांकित कंपन्यांचे मोबाईल तक्रारदारांना परत केले असून या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबद्दल समाधान व प्रशंसा व्यक्त होत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अप्पर पोलीस अधीक्षक मा. वैशाली कडूकर, व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पो.उपनि. सुधीर वाळुंज, पो.कॉ. विशाल शिंदे, हेमंत शिंदे, नितीन कदम, श्रावण राठोड व महेश पवार (सायबर) यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांनी वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अभिनंदन केले आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



