मतिमंद मुलांच्या शाळेला आर्थिक मदत
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
योद्धा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि जिवंत ऐतिहासिक देखाव्यांच्या माध्यमातून न्यू गजानन मंडळाला नावलौकिक मिळवून देणारे रणवीर गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे सर्व जल्लोषी कार्यक्रम रद्द करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. आपले जवळचे मित्र राहुल सणस यांच्या आकस्मिक निधनामुळे, त्यांच्या स्मरणार्थ वाई येथील 'रिव्हका साहिल अक्षर इन्स्टिट्यूट' या मतिमंद मुलांच्या शाळेला मदत सुपूर्द करण्यात आली.
रणवीर गायकवाड हे वाई शहरातील एक तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून ओळखले जातात. योद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक कार्य सुरू असतेच, शिवाय वाई व्यसनमुक्ती संघटनेचे सक्रिय सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत. दरवर्षी २६ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षीही विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य नियोजन करण्यात आले होते.
मात्र, त्यांचे अत्यंत जवळचे मित्र राहुल सणस यांचे काल आकस्मिक निधन झाले. या घटनेमुळे संपूर्ण मित्रपरिवार आणि परिसरात शोककळा पसरली. आपल्या जिवलग मित्राच्या जाण्याचे दुःख मानत रणवीर गायकवाड यांनी वाढदिवसाचा कोणताही सोहळा न करण्याचा निर्णय घेतला. वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनावश्यक खर्च टाळून, राहुल सणस यांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांनी मतिमंद मुलांच्या शाळेला आवश्यक मदत केली.
यावेळी बोलताना रणवीर गायकवाड भावूक झाले होते. "मित्र गमावण्याचे दुःख मोठे आहे, त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि समाजातील गरजू घटकांना आधार देण्यासाठी आम्ही हा छोटासा प्रयत्न केला आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
दुःखाच्या प्रसंगी संयम राखून सामाजिक भान जपल्याबद्दल आणि एका मित्राने दुसऱ्या मित्राला दिलेल्या या अनोख्या श्रद्धांजली बद्दल वाई शहरात रणवीर गायकवाड यांचे विशेष कौतुक होत आहे.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



