काळ आला होता पण वेळ आली नव्हती!
शिवशाही वृत्तसेवा,वाई ( प्रतिनिधी शुभम कोदे )
प्रशासकीय यंत्रणेचे मेलेले ढिपाड आणि खासगी वाहनधारकांची गुंडगिरी यामुळे आज वाई-शेलारवाडी रस्ता रक्ताने माखता माखता वाचला. गंगापुरी पुलावर झालेला भीषण अपघात हा केवळ 'अपघात' नसून तो प्रशासनाने जाणीवपूर्वक दिलेले आमंत्रण आहे. एमआयडीसीतील एका कंपनीतून कामगारांना सोडून परत येत असताना ही ट्रॅक्स (क्र. MH 06 W 2428) गंगापुरी नजीकच्या पुलावर आली असता, चालकाचा वेगावरचा ताबा सुटला.
गाडीने पुलाचा भक्कम कठडा उडवला आणि गाडीचा अर्धा भाग ओढ्याच्या हवेत लटकला. सुदैवाने गाडीत त्यावेळी कामगार नव्हते, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता, मात्र 'काळ आला होता पण वेळ आली नव्हती' याचा प्रत्यय स्थानिकांना आला. या घटनेने वाई एमआयडीसीमधील कामगारांच्या वाहतुकीचा प्रश्न आणि प्रशासनाचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आता प्रश्न असा उरतो की, आरटीओ आणि पोलीस प्रशासन एखादा 'बळी' जाण्याची वाट पाहत आहेत का?
वाई एमआयडीसीमधील कंपन्यांत कामगारांची ने-आण करणारी ही वाहने म्हणजे चालते-फिरते 'मृत्यूचे सापळे' बनली आहेत. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून, क्षमतेपेक्षा जास्त कामगार कोंबून ही वाहने सुसाट पळवली जातात. कित्येक वेळा या वाहनांचे चालक अनेकदा 'अल्पवयीन' असतात किंवा त्यांच्याकडे अवजड वाहन चालवण्याचा परवानाही नसतो. तरीही पोलीस याकडे 'अर्थपूर्ण' दुर्लक्ष का करतात? हा खरा संशोधनाचा विषय आहे. 'नियम' यांच्या पायदळी, 'परवाने' फक्त नावापुरते! बहुदा असेच म्हणावे लागेल.
एमआयडीसीत कामावर जाण्यासाठी कामगार खाजगी वाहनांचा वापर करतात. वेळेत पोहोचण्याच्या नादात ही वाहने शहराच्या अंतर्गत रस्त्यावरूनही सुसाट वेगाने धावतात. धक्कादायक बाब म्हणजे, 'वाहतुकीचे नियम पाळणे तर दूरच, पण लोकांच्या जिवाशी खेळणे' हाच या वाहनधारकांचा धंदा बनला आहे.
गंगापुरी येथील गोळीबार चौकात वाहनांच्या अतिवेगामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. एमआयडीसीला जोडणारा मुख्य रस्ता (रविवार पेठ मार्गे) खड्ड्यात गेल्यामुळे सर्व भार या शेलारवाडी रस्त्यावर आला आहे. सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा नागरिक, वृद्ध आणि लहान मुले शतपावलीसाठी बाहेर पडतात, तेव्हा या 'मुजोर' चालकांमुळे त्यांचा जीव टांगणीला लागलेला असतो.
या अपघातांना निमंत्रण देण्यात वाई पालिकेचाही मोठा वाटा आहे. ओढ्यावर साचलेला कचरा आणि तिथे ठाण मांडून बसलेली भटक्या कुत्र्यांची फौज वाहनचालकांसाठी कर्दनकाळ ठरत आहे. कुत्र्यांनी मागे धाव घेतल्यावर चालकाचे नियंत्रण सुटते आणि अपघात घडतात. कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पालिका प्रशासन कुंभकर्णी झोपेत ढाराढूर डुलक्या घेत आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या मार्गावर अवैध वाहतुकीचा उच्छाद मांडला आहे. तरीही वाहतूक शाखा या वाहनांवर कारवाई का करत नाही? रस्ता खराब असताना पर्यायी मार्गावर सुरक्षिततेचे उपाय का योजले नाहीत? लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या खासगी कंत्राटदारांना कोणाचे अभय आहे? पोलिस प्रशासन आणि वाहतूक विभाग एखादा जीव गेल्यावरच कारवाई करणार का? असे सवाल स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. "आज फक्त गाडी लटकली आहे, उद्या प्रेतं लटकलेली पाहायची नसतील तर आताच कारवाई करा! अन्यथा जनतेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही."
तात्काळ 'नाकाबंदी' करून सर्व कामगार वाहनांच्या परवान्यांची तपासणी व्हावी. अल्पवयीन चालकांच्या मालकांवर कडक फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत. ओढ्याकाठी सीसीटीव्ही बसवून कचरा टाकणाऱ्यांवर आणि बेजबाबदार चालकांवर नजर ठेवावी अशी, मागणी वाईकर नागरिक करत आहेत.
---------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



