९ आरोपी अटकेत, कार व हत्यारे जप्त
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
अपघाताचा बनाव करून एका तरुणाचा खून केल्याची गंभीर घटना शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली असून, शिरवळ पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावत ९ आरोपींना अटक केली आहे.
शिरवळ पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४४६/२०२५ भा.न्या.संहिता कलम १०३ (१), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल आहे. मौजे पळशी, ता. खंडाळा येथील दहाबिगा शिवारात पळशी–वडगाव–जाधव वस्ती रेसकोर्सकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर ही घटना घडली. आरोपींनी संगनमत करून अतिश अशोक राऊत (रा. शिरवळ) यास डोके, तोंड व पाठीवर जबर मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत त्याच्यावर सातारा सिव्हिल हॉस्पिटल व त्यानंतर पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
आरोपींनी अतिश राऊत याचा मृत्यू अपघातात झाल्याचा बनाव करून खुनाची घटना लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र अतिश राऊत यांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करून खुनाचा गुन्हा दाखल केला.
गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रथम तेजस बाळासाहेब भरगुडे (३४), दिपक बाळासाहेब भरगुडे (३२) व ऋषिकेश जगन्नाथ मळेकर (२८) यांना अटक केली. पुढील तपासात आणखी अविष्कार अनिल भरगुडे (२५), ऋषिकेश रामचंद्र भरगुडे (२७), नितिन पांडुरंग भरगुडे (३२), गणेश साधु भरगुडे (२६), सागर धनाजी भरगुडे (३६) व तुषार दत्तात्रय भरगुडे (३५) यांना अटक करण्यात आली. सर्व आरोपी रा. पळशी, ता. खंडाळा, जि. सातारा आहेत.
आरोपींकडून हुंडाई i-10 कार, लाकडी दांडके व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून, यातील तीन आरोपींना ९ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे व त्यांच्या पथकाने केली.
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



