निखिल कुर्हेकर यांना त्यांचे पाकीट केले परत
शिवशाही वृत्तसेवा, वाई (प्रतिनिधी शुभम कोदे)
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कर्तव्यावर असताना भुईंज पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या प्रामाणिकपणाचा प्रत्यय दिला आहे. अमरावती येथील एका बाईक रायडरचे हरवलेले पैशांनी भरलेले पाकीट आणि महत्त्वाचे दस्तऐवज शोधून काढून ते त्याला सुरक्षितपणे सुपूर्द करण्यात आले.
अमरावती येथील निखिल सुरेश कुर्हेकर हे आपल्या मित्रांसोबत पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून बाईक रायडिंग करत जात होते. प्रवासादरम्यान भुईंज परिसरात त्यांच्या खिशातील पाकीट अचानक रस्त्यावर पडले. याच वेळी महामार्गावरून जाणारी एक चारचाकी गाडी पाकीट पडल्याचे पाहून थांबली. त्याच वेळी भुईंज पोलीस तेथे गस्तीवर असताना त्यांनी तातडीने चौकशी केली. पोलिसांनी ते पाकीट ताब्यात घेऊन तपासले असता, त्यात रोख रक्कम आणि महत्त्वाचे ओळखपत्र आढळून आले. त्यातील माहितीवरून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली आणि निखिल कुर्हेकर यांचा संपर्क क्रमांक मिळवला. त्यांना फोन करून पाकिटाबाबत खात्री पटल्यानंतर भुईंज पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.
भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, वैभव टकले, राजाराम माने आणि संजू आवले यांनी खात्री पटवून निखिल कुर्हेकर यांना त्यांचे पाकीट सन्मानपूर्वक परत केले. आपले महत्त्वाचे कागदपत्रे आणि पैसे परत मिळाल्याने कुर्हेकर यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.
विशेष म्हणजे, गेल्याच आठवड्यात भुईंज पोलिसांनी एका महिलेची दागिने आणि कागदपत्रांनी भरलेली बॅग, जी ती लक्झरी बसमध्ये विसरली होती, ती शोधून देऊन तिला परत केली होती. एकामागून एक अशा चांगल्या कामगिरीमुळे भुईंज पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
"माझे महत्त्वाचे आयडी आणि पैसे हरवल्याने मी चिंतेत होतो, मात्र भुईंज पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मला माझे पाकीट सुखरूप मिळाले. पोलिसांच्या या कामगिरीचे मी कौतुक करतो"
निखिल कुर्हेकर
(बाईक रायडर)
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



