औषध व अन्न प्रशासन विभाग गांधारीच्या भूमिकेत - भेसळ माफिया जोमात
शिवशाही वृत्तसेवा, सातारा (प्रतिनिधी शुभम कोदे)
ध्वनी,जल व वायु प्रदूषणाबरोबरच आता रासायनिक खते व विषारी रंगद्रव्यांचा अतीवापर करून मोठ्या प्रमाणात भाजीपाला भाजी मंडईत विक्रीसाठी येत आहे.नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने हे घातक ठरत आहे. अन्नपदार्थांमधील भेसळ त्याचबरोबर दूध, पनीर, खवा व सुकामेवा यामधील भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होत असताना, आता नव्याने त्यात भाजीपाल्याची भर पडली आहे.निरोगी आरोग्याच्या दृष्टीने भाजीपाल्यामधून मिळणारे जीवनसत्व (विटामिन) हे मानवी शरीराला पूरक ठरत असताना आता भाजीपाला ही विषमय होऊ लागला आहे.सातारा भाजी मंडईत सध्या विविध भाजीपाल्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढले आहे.अनेक भाजीपाल्यांमध्ये विषारी रंगद्रव्यांचा मारा केलेल्या भाज्या विक्रीला येत आहेत.त्यामुळे नागरिकांनी आता सजग होणे गरजेचे आहे.सध्या कोबी, फ्लॉवर बरोबरच वांगी, टोमॅटो व इतर अनेक भाज्यांवर विषारी रंगद्रव्यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.विषारी रंगद्रव्ये व रासायनिक खतांचा अतिवापराचा परिणाम नागरिकांच्या विशेषता लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होत असून ते विविध आजारांचे शिकार होत आहेत.
पिकवलेली फळे तसेच दूध, पनीर, खवा, मिठाई व दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळ ही नित्याची बाब झाली असताना आता त्यात भाजीपाल्यांमध्ये ही भेसळ व विषारी रंगद्रव्यांचा अतिवापर वाढला असल्याने हे मानवी जीवनासाठी खूपच चिंताजनक आहे.या विषारी रंगद्रव्यांचा व रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर भाजीपाल्यांवर होत असल्याने नागरिकांमध्ये कर्करोगांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले असल्याचे डॉक्टरांचे मत आहे.
भेसळ युक्त अन्नपदार्थ बरोबरच बनावट व बोगस औषधांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.मानवी जीवनाच्या अस्तित्वालाच यामुळे धोका निर्माण झाला आहे. या भेसळीबरोबरच आता फळे व भाजीपाल्यांची ही भर पडली आहे.त्यामुळे सकस आहार ही कल्पना आता कालबाह्य झाली आहे.वास्तविक बोगस औषधे व विषारी रंगद्रव्यांचा वापर करून पिकवलेली फळे व भाजीपाला यावरती कडक निर्बंध संबंधित विभागाने घालने गरजेचे असताना ते गांधारीच्या भूमिकेत आपली भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे.यावरती कडक कारवाईचे अधिकार औषध व अन्न प्रशासन विभागाला असताना त्यांचे होणारे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर बेतत आहे.
श्रीरंग काटेकर सातारा
-----------------------
---------------------
गूगल न्यूज वर शिवशाही फॉलो करा
इथे क्लिक करून करून शिवशाही न्यूज टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा



